26 February 2021

News Flash

‘ही तोडफोड पाहून सरदार पटेलही रडले असते’, ग्रामस्थांचे पंतप्रधान मोदींना पत्र

'मोदीजी, तुम्ही नको असलेल्या पाहुण्यासारखे उद्घाटनासाठी बिनधास्त या. पण आम्ही तुमचे स्वागत करणार नाही'

पंतप्रधान मोदींना पत्र

जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचं काम पूर्ण झालं आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. सध्या जपान दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी तेथील भारतीयांशी संवाद साधताना या मुर्तीबद्दल माहिती दिली. एकंदरितच मोदी सरकार या भव्यदिव्य प्रकल्पाचा मोठा गाजावाजा करुन उद्घाटन करण्याच्या तयारीत आहे. तरी दुसरीकडे या मुर्तीबद्दल आक्षेप घेणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. त्यात मुख्यपणे या प्रकल्पाच्या परिसरातील २२ गावांतील गावकऱ्यांचाही समावेश आहे. या २२ गावातील ग्रामस्थांनी पंतप्रधान मोदींना या प्रकल्पाला विरोध दर्शवणारे खुले पत्रच लिहिले आहे.

जगातील सर्वात उंच मुर्ती साकारण्यासाठी सरदार सरोवर येथील धरणाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ नाराज झाले आहेत. ‘आज सरदार पटेल जिवंत असते तर मुर्तीसाठी करण्यात आलेली धरण परिसरातील तोडफोड पाहून त्यांनाही रडू कोसळले असते. तसेच उद्घाटनाच्या संमारंभासाठी मोदी उपस्थित राहणार असले तरी गावकरी त्यांचे स्वागत करणार नाहीत’, असेही या गावकऱ्यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. ‘पंतप्रधान मोदी जी तुम्हाला सांगताना खूप दु:ख होतंय. पण जेव्हा तुम्ही सरदार पटेलांच्या मुर्तीच्या उद्घाटनासाठी ३१ तारखेला अहमदाबादमध्ये याल तेव्हा आम्ही तुमचे स्वागत करणार नाही. तुम्ही नको असलेल्या पाहुण्यासारखे बिनधास्त या पण आम्ही तुमचे स्वागत करणार नाही.’, असं गावकऱ्यांनी पत्रात म्हटलं आहे.

सरदार सरोवर परिसरात असणारी जंगले, नद्या, धबधबे, जमीन आणि शेती व्यवसाय आमच्यासाठी जगण्याचे साधन आहे. पण या प्रकल्पामुळे सगळं काही नष्ट करण्यात आलं आहे. आणि आता यासाठीचा सोहळा साजरा होणार असल्याबद्दल या पत्रात दु:ख व्यक्त करण्यात आले आहे. तसेच ‘पंतप्रधान मोदी जी, तुम्हाला वाटत नाही का हा उद्घाटन सोहळा करणं म्हणजे एखाद्याच्या मरणाचा सोहळा साजरा करण्यासारखं आहे?’; असा सवालही या गावकऱ्यांनी मोदींना केला आहे.

गावकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवताना यासाठी आलेल्या खर्चाच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. सामान्य लोक कष्टाने पैसा कमवून कराच्या रुपाने सरकारची तिजोरी भरतात. मात्र सरकार अशा अवाढव्य मुर्ती बांधण्यासाठी हाच पैसा पाण्यासारखा खर्च करते. या भागातील अनेक गावांमध्ये अद्याप गरजेच्या सुविधा पोहचलेल्या नाहीत. पिण्याचे पाणी, रुग्णालये, शाळा अशा अनेक सुविधा गावांमध्ये आजही उपलब्ध नाहीत. या सुविधांसाठी सरकार पैसे का खर्च करत नाही असा सवालही गावकऱ्यांनी केला आहे.

सरदार पटेलांची ही मुर्ती उभारण्यासाठी २ हजार ९८९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. २७ ऑक्टोबर २०१४ रोजी लार्सन अॅण्ड टुब्रोने या मुर्ती बांधणीचे कंत्राट मिळवले होते. अडीच हजार कामगार, २०० इंजिनिअर्सने आपले कौशल्य पणाला लावून ही मुर्ती साकारली आहे. यामध्ये चिनी कामगार आणि इंजिनिअर्सचाच भरणा अधिक होता. २२ गावांव्यतिरीक्त स्थानिक जनजातीच्या नेत्यांनीही सरदार पटेलांच्या मुर्ती अनावरण सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. ज्याप्रकारे ही मुर्ती बनवण्यासाठी नैसर्गिक घटकांची तोडफोड करण्यात आली, त्यांचे नुकसान करण्यात आले ते पाहता या सोहळ्याला उपस्थित राहणे अयोग्य ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 10:14 am

Web Title: sardar patel would have cry seeing mass destruction villagers write open letter to pm modi
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या
2 राहुल गांधींविरोधात शिवराजसिंह चौहान दाखल करणार मानहानीचा खटला
3 सानिया मिर्झा-शोएब मलिक झाले आई-बाबा!
Just Now!
X