खोटे नाव वापरून बनावट पारपत्र तयार करण्याच्या आरोपावरून कुख्यात गुंड अबू सालेम याला झालेली सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवली आहे. सालेमने या शिक्षेविरोधात केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावले.
खोटय़ा नावाने बनावट पारपत्र बाळगल्याप्रकरणी सालेम याला गेल्या वर्षी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) हैदराबाद येथील विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. या प्रकरणी सालेमला सात वर्षांची सक्तमजुरीही ठोठावण्यात आली होती. मात्र, आपल्याला खोटय़ा आरोपांखाली शिक्षा झाली असल्याचा कांगावा करत सालेमने सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एफ. एम. कलिफुल्ला आणि एस. के. सिंग यांच्या खंडपीठाने सालेमची याचिका फेटाळून लावली.