देशात तसंच जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत करोनावरील लस विकसित करण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. करोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये भारतदेखील आघाडीवर आहे. परंतु आठवड्याभराच्या कालावधीतच आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी देशात करोनाची पहिली लस तयार करण्यात आली होती. तसंच जुलै महिन्यात त्या लसीची चाचणी करण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली होती. दरम्यान, देशात दुसरी करोना लसही तयार करण्यात आली असून त्याच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांमधील ही दुसरी लस आहे जिच्या मानवी चाचणीसाठी ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) मान्यता दिली आहे.

करोनाची ही दुसरी लस अहमदाबादची कंपनी झायडस कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड तयार करत आहे. ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) या लसीच्या फेज १ आणि फेज २ च्या मानवी चाचणीसाठी मान्यता दिली आहे. दरम्यान, ही मानवी चाचणी पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. या लसीची प्राण्यांवर यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली आहे. याच आधारावर त्यांना पुढील फेजसाठी चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आणखी वाचा- बापरे… एका दिवसात देशात आढळले २० हजाराहून अधिक करोनाबाधित

पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार कंपनी लवकरच मानवी चाचणीसाठी एनरॉलमेंट प्रक्रिया सुरू करणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी कंपनीला तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचंही म्हटलं जात आहे. देशातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारनंदेखील उशीर न करता त्वरित याच्या पुढील चाचणीला परवानगी दिली आहे.

आणखी वाचा- देशात पहिली करोना लस COVAXIN १५ ऑगस्ट रोजीच बाजारात येणार?

भारत बायोटेकच्या लसीलाही परवानगी

भारत बायोटेकनं करोनावरील लस COVAXIN तयार केल्याची सोमवारी घोषणा केली होती. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली होती. त्यानंतर भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं फेज १ आणि फेज २ मानवी वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली. “एसएआरएस-सीओव्ही -२ स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्हीमध्ये वेगळं करण्यात आले आणि नंतर भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली,” असं कंपनीनं निवेदनात म्हटलं होतं.