अपंगांना वापरता येईल असा पहिला हँडस फ्री स्मार्टफोन तयार केल्याचा दावा एका इस्रायली कंपनीने केला आहे. केवळ डोक्याच्या हालचालीने या स्मार्टफोनचा वापर करता येतो.
हा स्मार्टफोन सीसेम इनेबल या कंपनीने तयार केला असून तो मेरूरज्जूला इजा झालेले लोक म्हणजे अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरेसॉसिस (एएलएस) सेरेब्रल पाल्सी व इतर व्यंग असलेल्या  लोकांना त्याचा उपयोग होतो.
सिसेम हा अँड्रॉइड स्मार्टफोन असून त्यात तुमचे डोके कसे हलते त्याचा वेध घेण्याचे तंत्रज्ञान वापरले आहे, असे ज्यूइश टेलिग्राफ  एजन्सी या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. त्याचा कर्सर म्हणजे आभासी बोट आहे.
या फोनमध्ये व्हिजन अलगॉरिथम व फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे, त्यामुळे व्यक्तीच्या हालचाली टिपल्या जातात व पडद्यावरील कर्सर नियंत्रित केला जातो. जे आपण धडधाकट माणसे करतो ते व्यंग असलेले लोक या तंत्रज्ञानाने करू शकतात.
या फोनला अलिकडेच व्हेरिझॉन पॉवरफुल अ‍ॅन्सर्स पुरस्कार मिळाला, तो १० लाख डॉलरचा आहे. या फोनची किंमत मात्र १ हजार डॉलर आहे.
या स्मार्टफोनची निर्मिती गिओरा लिव्हनी यांनी केली असून ते स्वत: व्यंगग्रस्त आहेत व आता ते ३० सिसेम स्मार्टफोन व्यंग असलेल्या लोकांना देणार आहेत. लिव्हाइन यांनी टीव्हीवर एक सादरीकरण पाहिले होते, त्यात गेमचे नियंत्रण डोक्याच्या हालचालींनी केले होते.
त्यांना विद्युत अभियांत्रिकीची पाश्र्वभूमी असल्याने त्यांनी डोक्याची हालचाल ओळखणारे तंत्रज्ञान शोधले. आता ते नेहमी टेक्स्टिंग करतात, व्हॉटसअ‍ॅपवर मित्रांना व तीन मुलांना संदेश पाठवतात. व्यंग असलेले लोक समाजातून मागे पडतात; आता ते त्यांना वापरता येण्यासारखा स्मार्टफोन मिळाल्याने मागे पडणार नाहीत. विशेष करून तरूण व्यंगग्रस्तांना त्याचा फायदा होणार आहे.

*फोनचे नाव-सिसेम अँड्रॉइड
* निर्माता संशोधक – गिओरा लिव्हनी
* अपंगांना समाजाशी जोडण्यात फायदा
* डोक्याच्या हालचाली ओळखणारे तंत्रज्ञान
* आभासी बोटाचा वापर
* किंमत १००० डॉलर
* व्हेरिझॉन पॉवरफुल अ‍ॅन्सर्स पुरस्कार(१० लाख डॉलर्सचा)