राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांना शनिवारी त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी झटका दिला. आरएलएसपीच्या बिहारमधील आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन आपण अजूनही भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक असल्याचे जाहीर केले. उपेंद्र कुशवाह यांनी व्यक्तीगत हितासाठी एनडीएबरोबर काडीमोड घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

आरएलएसपीचे विधानसभेतील आमदार सुधांशू शेखर आणि ललन पासवान तसेच विधान परिषदेतील आमदार संजीव सिंह शाम यांनी आपण एनडीएमध्ये असल्याचे जाहीर केले. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या सुधांशू शेखर यांना मंत्रीपद देण्याचीही त्यांनी मागणी केली.
आम्ही खऱ्या आरएलएसपीचे प्रतिनिधीत्व करतो. आम्हाला पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे असा दावा त्यांनी केला. आपण लवकर निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत असे त्यांनी सांगितले. आरएलएसपीने २०१४ लोकसभेची आणि त्यानंतर २०१५ बिहार विधानसभेची निवडणूक एनडीएसोबत लढवली होती.

आरएलएसपीचे बिहारमध्ये कुशवाह यांच्यासह तीन खासदार आणि तीन आमदार आहेत. एनडीएचा भाग असलेले राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी सोमवारी एनडीएला सोडचिठ्ठी देताना केंद्रीय राज्यमंत्रीपदाचाही राजीनामा दिला. बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयूमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यापासून उपेंद्र कुशवाह नाराज होते. आपल्या पक्षाला अपेक्षित जागा मिळत नाहीत अशी त्यांची तक्रार होती. याच नाराजीतून त्यांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली. पण आता त्यांच्याच पक्षात बंडखोरी झाली आहे.