राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज दिल्लीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीनंतर त्यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली.

शरद पवार नाराज आहेत अशी चर्चा सुरू असल्याबद्दल राऊत यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना राऊत यांनी, “शरद पवारांची नाराजी कधी तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर पाहिली आहे का? जे शरद पवारांना ओळखताता त्यांना माहिती आहे. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी कधी दिसत नाही, पण ते चिंतन करत असतात. माहिती घेत असतात आणि निर्णय घेत असतात.” असं सांगितलं.

यावेळी संजय राऊत यांना भेटीबाबत विचारण्यात आलं असता, “सर्व काही ठीक आहे, काहीच गडबड नाही. तुमच्या मनात अशी का शंका आहे की, काहीतरी गडबड आहे.” असं ते म्हणाले. याशिवाय, “शरद पवार हे एक मोठे नेते आहेत, त्यांच्याबरोबर अनेक मुद्यांवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारचे ते मार्गदर्शक आहेत, त्यांच्याशी नेहमी चर्चा होत असते.” असंही राऊत यांनी बोलून दाखवलं.

तसेच, सचिन वाझेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाठींबा देत असल्यांच्या चर्चांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “असं अजिबात नाही. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे व कायदाच काम करेल, मग कितीही मोठी व्यक्ती असो.” तर, गृहमंत्र्यांच्या बदलीबाबतच्या चर्चांवर बोलताना, “या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही, असं मला वाटतं. याबाबत एकतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा शरद पवार बोलू शकतात. परंतु आता तरी मला असं नाही वाटत की राज्यात काही मोठे बदल होतील किंवा होण्याची शक्यता आहे.” असं संजय राऊत यांनी सांगितलं.