सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवादाच्या मुद्दय़ावर केवळ खेद व्यक्त केला आहे. त्यांनी माफी मागितलेली नाही, असे संसदीय कार्यमंत्री कमलनाथ यांनी एक चित्रवाणी वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले.
ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी ‘डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट’ या मुलाखतीच्या कार्यक्रमादरम्यान कमलनाथ यांना या मुद्दय़ावर बोलते केले. तो खेद होता की माफी, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर कमलनाथ उत्तरले, की शिंदे यांनी खेद असा शब्द वापरलेला आहे. आता आपण तो बदलू शकत नाही. त्यांची दिलगिरी भाजपनेही स्वीकारली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी शिंदे आणि कमलनाथ यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्या वेळी शिंदे यांच्या दिलगिरीच्या विषयावर बोलणे झाले. त्यांच्या निवेदनाची भाषा काय असावी यावर चर्चा झाली. तेव्हा इतके म्हटले तरी पुरे आहे, असे भाजप नेत्यांनी म्हटले होते, अशी माहिती कमलनाथ यांनी दिली. नंतर काही गुंतागुंत होऊ नये म्हणूनच शिंदे यांच्या दिलगिरीबाबत आधीच भाजप नेत्यांशी चर्चा करण्यात आली, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.