लोकसभेसाठी राज्यात पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत येत्या ११ एप्रिलला मतदान होणार आहे. या सातही ठिकाणी प्रचाराने अद्याप वेग घेतला नसला तरी उमेदवार निश्चितीनंतर चित्र स्पष्ट व्हायला हळूहळू सुरुवात झाली आहे.

उपराजधानीत रंगतदार सामना

सर्व देशाचे लक्ष लागलेल्या नागपूरमध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात थेट लढत आहे. गेल्या पाच वर्षांत गडकरींनी उपराजधानीत भरपूर विकासकामे केली. शिवाय भाजपकडून जरी तसा प्रचार होत नसला तरी गडकरी हे भविष्यातील पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे. भाजपची मजबूत संघटनात्मक शक्ती व गडकरींमध्ये असलेला सर्वसमावेशकता हा गुण यामुळे येथे त्यांचे पारडे जड आहे. काँग्रेसने मुस्लीम, दलित या नाराज मतदारांवर लक्ष ठेवतांनाच पटोलेंना उमेदवारी देऊन कुणबी कार्ड खेळले आहे. थेट मोदींना सुनावत भाजप सोडणारे नाना लढाऊ असल्याने येथील लढत अखेरच्या टप्प्यात रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. गटागटांत विभागली गेलेली काँग्रेस एकसंध होईल व जातीचे राजकारण जुळेल का यावर पटोलेंचे भवितव्य अवलंबून आहे.

रामटेकमध्ये सेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्याविरुद्ध काँग्रेसने नवख्या किशोर गजभियेंना रिंगणात उतरवले आहे. एकेकाळी काँग्रेसचा गड अशी ओळख असलेल्या या क्षेत्रात तुमानेंची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. तरीही खिळखिळी झालेली काँग्रेस व माजी नोकरशाहाची उमेदवारी सध्यातरी तुमानेंच्या पथ्यावर पडणारी आहे. भंडारा, गोंदियात राष्ट्रवादीने नाना पंचबुद्धे, तर भाजपने सुनील मेंढे हे दोन्ही कुणबी उमेदवार दिले आहे. येथे भाजपच्याच पोवार समाजाचे राजेंद्र पटले यांनी बंडखोरी केली आहे. दीड वर्षांपूर्वी येथे पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे कुकडे विजयी झाले होते. ग्रामीण जनतेचा राग यातून दिसला होता. या पाश्र्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांचे खडय़ासारखे उमेदवार बदलणे यावेळी राष्ट्रवादीला महागात पडेल का, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

गडचिरोलीत भाजप अडचणीत?

गडचिरोलीत भाजपचे खासदार अशोक नेते व काँग्रेसचे डॉ. उसेंडी यांच्यातील थेट लढतीत सध्यातरी काँग्रेसचे पारडे जड आहे. आदिवासी व दलितांसोबतच नेतेंविषयी असलेली नाराजी येथे भाजपला अडचणीत आणू शकते. चंद्रपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर व सेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले बाळा धानोरकर यांच्यात चुरशीची लढत आहे. प्रस्थापितांविरोधी लाट व कुणबी समाजाची एकगठ्ठा मते यावर काँग्रेसचे येथील गणित अवलंबून आहे. अहिरांचा तगडा संपर्क आहे. येथे थेट लढत नेहमीच भाजपला अडचणीची ठरली आहे. वध्र्यात भाजपचे खासदार रामदास तडस व काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्यातही चुरशीची लढत आहे. मध्यंतरी येथे तेलीविरुद्ध कुणबी असा वाद रंगला होता. या पाश्र्वभूमीवर सध्या भाजपमध्ये असलेले दत्ता मेघे यांची भूमिका यावेळी निर्णयक ठरणारी आहे.तडस यांचे काम चांगले आहे, तर टोकस यांच्या पाठीशी पूर्ण पक्ष उभा राहील का, हा प्रश्न अजूनही कायम आहे.

यवतमाळ-वाशिममध्ये सेनेच्या खासदार भावना गवळी यावेळी अडचणीत आहेत. सेनेचे आमदार त्यांच्यामागे पूर्ण क्षमतेने नसणे व भाजपच्या आडेंनी केलेली बंडखोरी गवळींची डोकेदुखी वाढवणारी आहे. येथे काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना रिंगणात उतरवले आहे. येथे बंजारा व आदिवासी मते कुणाच्या बाजूने झुकतात यावर बरेच काही अवलंबून आहे. नागपूरचा अपवाद सोडला तर पहिल्या टप्प्यात होणारे मतदान प्रामुख्याने ग्रामीण भागात आहे. ग्रामीण जनतेत सरकारविषयीची नाराजी स्पष्ट दिसते. मोदींनी केवळ घोषणा केल्या असे लोक बोलून दाखवतात. ही नाराजी मतांमध्ये परावर्तित झाली तर युतीच्या अडचणी वाढू शकतात. विदर्भात नेहमी निर्णायक ठरणारी बसप आणि सध्याची वंचित आघाडी यावेळी प्रभावी नाही. त्यामुळे युती विरुद्ध आघाडी अशी थेट लढत आहे.

गेल्यावेळी विदर्भात निभ्रेळ यश मिळवणाऱ्या युतीला यावेळी त्याची पुनरावृत्ती करण ेकठीणआहे. विदर्भाच्या ग्रामीण भागात असलेली सरकारविषयीची नाराजी मतांमध्ये परावर्तित झाली तर काँग्रेस व राष्ट्रवादी खाते उघडण्याची संधी मिळू शकते. मात्र विदर्भावर युतीचाच वरचष्मा राहणार हे स्पष्ट आहे.