News Flash

इम्रान खान यांना शांतीदूत व्हायचे स्वप्न पडले काय?-शिवसेना

शिवसेनेचा इम्रान खान यांच्यावर निशाणा

(संग्रहित छायाचित्र)

इम्रान खान याना शांतीदूत व्हायचे स्वप्न पडले काय? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने पाकिस्तानात इम्रान खान यांनी केलेल्या भाषणाचा समाचार घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना खरोखर शांतता हवी असेल तर त्यांनी आधी भारताविरोधात उठाव करणाऱ्या सगळ्या दहशतवाद्यांना जेरबंद करावे किंवा भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईला पाठिंबा द्यावा. एकीकडे इम्रान खान शांततेची भाषा करणार दुसरीकडे मसुद, हाफिज सईदसारखे सैतान आमचे रक्त सांडणार, ही शांतता नाही असंही शिवसेनेने म्हटलं आहे. सामनच्या अग्रलेखात इम्रान खान यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?
इम्रान खान महाशयांना शांतिदूत व्हायचे स्वप्न पडले आहे काय? पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांनी युद्धाची भाषा केली नाही. चर्चा करू, चर्चेला तयार आहोत, असे त्यांनी हिंदुस्थानला सांगितले. इम्रान खान यांचे म्हणणे असे की, माझ्याआधी काय झाले ते माहीत नाही. मी नव्या पाकिस्तानची भूमिका मांडतोय. इम्रान खान यांनी पडते घेतले आहे, पण जुन्या पाकिस्तानात जे हाफीज सईद, मसूद अजहर होते तेच आज इम्रानच्या नव्या पाकिस्तानातदेखील दहशतवाद्यांचे कारखाने चालवत आहेत. आमच्या लष्कराने हे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. वास्तविक हेच कार्य नव्या पाकिस्तानची वकिली करणाऱ्या इम्रान खान यांनी करायला हवे होते. ‘‘हिंदुस्थानात निवडणुका येत आहेत म्हणून पाकिस्तानला ‘टार्गेट’ करू नका, युद्धाचा माहोल करू नका. यात दोन्ही देशांचे नुकसान आहे,’’ असे पाकचे पंतप्रधान सांगतात. इम्रानचे हे विधान अगदीच दुर्लक्षित करून चालणार नाही, अशी भूमिका या देशातील काही राजकीय पक्षांनी घेतली आहे. मुळात हिंदुस्थानच्या द्वेषावरच पाकिस्तानचे अस्तित्व, राजकारण टिकून आहे. जो हिंदुस्थानला खतम करण्याची भाषा जोरात करेल तोच पाकचा लोकप्रिय नेता ठरतो. हिंदुस्थानातही त्यापेक्षा वेगळे चित्र नाही.

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला घडवून आमच्या 40 जवानांचा बळी घेणारा ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर हा आजारी असून त्याला घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे असे आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनीच म्हटले आहे. याचाच अर्थ मसूद अजहर हा पाकिस्तानातच आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना जर खरंच हिंदुस्थानसोबत शांतता हवी असेल तर त्यांनी आधी त्यांच्या ‘नव्या’ पाकिस्तानात असलेल्या मसूदचा निकाल लावावा. हिंदुस्थानविरोधी उठाव करणाऱ्या या दहशतवाद्यांना इम्रान खान यांनी जेरबंद करावे, नाही तर हिंदुस्थानी लष्कराने केलेल्या कारवाईला पाठिंबा द्यावा. तेवढी हिंमत ते दाखविणार आहेत का? इम्रान खान एकीकडे शांतीची भाषा बोलणार व मसूद अजहर, हाफीज सईदसारखे सैतान आमचे रक्त सांडणार. ही शांतता नाही.  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आधी शांततेची व्याख्या काय हे समजून घ्यावे, इतकेच आम्हाला त्यांना सांगायचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 5:20 am

Web Title: shiv sena criticises imran khan on his peace symbol statement issue
Next Stories
1 दीर्घ प्रतीक्षेनंतर अभिनंदन मायदेशी
2 भारतात परतल्यावर चांगलं वाटतं आहे, अभिनंदन यांची पहिली प्रतिक्रिया
3 ’26/11 च्या हल्ल्यानंतर काहीच झाले नाही, आम्ही पुलवामा आणि उरीचा बदला घेतला’
Just Now!
X