News Flash

शिवसेनेचा आर्थिक डोलारा व्हिडीओकॉनच्या देणगीवर

राज्यसभा खासदार राजकुमार धूत यांच्या मालकीच्या समूहाकडून ८५ कोटींची देणगी

राज्यसभा खासदार राजकुमार धूत यांच्या मालकीच्या समूहाकडून ८५ कोटींची देणगी 

शिवसेनेने सलग तीन वेळा राज्यसभेची खासदारकी दिलेल्या राजकुमार धूत यांच्या मालकीच्या व्हिडीओकॉन उद्योग समूहाने २०१५-१६ या मागील आर्थिक वर्षांमध्ये शिवसेनेला तब्बल ८५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. शिवसेनेला मागील संपूर्ण वर्षांत मिळालेल्या ८६.८४ कोटी रुपयांच्या एकूण देणग्यांमध्ये एकटय़ा व्हिडीओकॉनचा वाटा सुमारे ९८ टक्के आहे! व्हिडीओकॉनच्या या घसघशीत देणगीने शिवसेना या क्षणाला देशातील सर्वाधिक देणग्या मिळविलेला पक्ष आहे.

शिवसेनेचे सचिव आणि राज्यसभा खासदार अनिल देसाई यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या देणग्यांच्या तपशिलामध्ये व्हिडीओकॉनच्या ‘राजकीय औदार्या’ची माहिती आहे. एकूण ८ कंपन्या (कॉर्पोरेट्स) आणि १३५ व्यक्ती, संस्थांनी (नॉन- कॉपरेरेट्स) शिवसेनेला मागील वर्षी ८६ कोटी ८४ लाख १४ हजार ४१८ रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. त्यामध्ये एकटय़ा व्हिडीओकॉनचे ८५ कोटी आहेत. ही रक्कम धनादेश आणि ऑनलाइन हस्तांतरित केल्याचा उल्लेख आहे, पण त्याचे तपशील दिलेले नाहीत.

व्हिडीओकॉनने २०१४-१५मध्येही शिवसेनेला २ कोटी ८३ लाखांची देणगी दिली होती. त्या वर्षी शिवसेनेला एकूण २५ कोटी ५८ लाख २५ हजार रुपयांच्या देणग्या मिळाल्या. ते वर्ष विधानसभा निवडणुकीचे होते. पण त्याच्या पुढच्या वर्षी (१५-१६) व्हिडीओकॉनने थेट तीसपट अधिक देणगी दिल्याने शिवसेनेची एकूण देणगी रक्कम तिपटीहून अधिक (२५.५८ कोटींवरून ८६.८४ कोटींवर) वाढली.

उद्योगपतींना नेहमीच राज्यसभेत पाठविणाऱ्या शिवसेनेने व्हिडीओकॉन समूहाचे प्रवर्तक आणि सहमालक असलेल्या राजकुमार धूत यांना सलग तीनदा खासदारकी दिली आहे. पहिल्यांदा २००२, नंतर २००८ मध्ये आणि नुकतेच २०१४ मध्ये. त्यांची मुदत २०२०पर्यंत असेल. संसदीय कामकाजात सक्रिय असलेले धूत यांचा विविध उद्योग संस्थांशी निकटचा संबंध आहेत. त्यांचे बंधू वेणुगोपाळ धूत हे समूहाचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालक आहेत.

देशात क्रमांक पहिला

व्हिडीओकॉनच्या घसघशीत देणगीमुळे शिवसेनेने देणग्यांमध्ये थेट काँग्रेस, डावे पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी आदी राष्ट्रीय पक्षांना मागे टाकले आहे. काँग्रेसला फक्त २२ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ७१ लाख ३८ हजार ८१९ रुपये. बसपाने तर देणगीच मिळाली नसल्याचा दावा प्रतिज्ञापत्रात केला आहे. ३० सप्टेंबरची मुदत संपून गेल्यानंतरही भाजपने अद्याप देणग्यांचा हिशेब आयोगाला दिलेला नाही. मात्र, तो सादर झाल्यास कदाचित शिवसेनेचा पहिला क्रमांक भाजपला मिळेल. १४-१५मध्ये ४३७.३५ कोटींच्या देणग्या भाजपला मिळाल्या होत्या.

शिवसेनेचे बडे देणगीदार..

  • व्हिडीओकॉन – ८५ कोटी
  • झेडएडी इंटरप्रायजेस – २० लाख
  • गरवारे चॅरिटेबल ट्रस्ट, विले पार्ले – ११ लाख
  • विनायक निम्हण, पुणे शहरप्रमुख – १० लाख
  • यासर अराफत इन्फ्रा – ५.०१ लाख
  • केवल किरण क्लॉथिंग, गोरेगाव – ५.०१ लाख
  • सेरेनेटी ट्रेडर्स, विक्रोळी – ५ लाख
  • मॉडर्न रोड मेकर्स, अंधेरी पूर्व – ३ लाख

(स्रोत – निवडणूक आयोग)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:12 am

Web Title: shiv sena economy depend on videocon donations
Next Stories
1 चलनतिढा सुटेना..
2 नोटाबंदीची अंबानी आणि अदानींना पूर्वकल्पना
3 सुषमा स्वराज यांना किडनी देण्यास पोलीस हवालदाराची तयारी
Just Now!
X