पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर भाजपाने आणि एनडीएतल्या पक्षातल्या नेत्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. ज्यामध्ये शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचाही समावेश आहे. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.  त्यांना कोणते खाते दिले जाईल हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिवसेनेच्या वाट्याला एक मंत्रिपद आलं आहे.

लोकसभा निवडणुकांच्या आधीच शिवसेना आणि भाजपा यांची युती झाली होती. त्यामुळे २०१४ प्रमाणेच यावेळीही शिवसेनेच्या वाट्याला किमान एक मंत्रिपद येईल अशी चर्चा होती. केंद्रीय मंत्री म्हणून अरविंद सावंत यांची वर्णी लागली आहे. आता त्यांना कोणते खाते दिले जाणार हे पहाणेही महत्त्वाचे ठरणार आहे. २०१४ मध्ये शिवसेनेच्या अनंत गीते यांना अवजड आणि उद्योग खात्याचा कार्यभार देण्यात आला होता. आता अरविंद सावंत यांनाही हेच खातं दिलं जाणार की वेगळं खातं दिलं जाणार याबाबत काही अंदाज वर्तवले जात आहेत.

यावेळी मंत्रिमंडळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे आता त्यांची म्हणजेच भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जागा कोण घेणार याची चर्चा भाजपात रंगली आहे.