गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर पक्षाच्या नेत्यांकडून कौतुकाचा वर्षांव सुरूच असून, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी तर मोदींची तुलना थेट भारताचे पोलादी पुरुष अशी ओळख असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशीच केली आहे. दरम्यान, शिवराज चौहान यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे.
मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व आणि काम पाहता त्यांची तुलना केवळ सरदार पटेल यांच्याशीच होऊ   शकते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नरेंद्र मोदी यांना पक्षाचे राष्ट्रीय प्रचारप्रमुख म्हणून नेमले असून, हैदराबाद येथे होणाऱ्या मोदींच्या विशाल सभेच्या एक दिवस आधी चौहान यांनी ट्विटरवरून मोदींची स्तुती केली. चौहान यांच्या ट्विटवर काँग्रेसने टीका केली आहे.
नरेंद्र मोदी यांची सरदार पटेल यांच्याशी केलेली तुलना ही स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या एका नेत्याचा घोर अपमान आहे. पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला आहे. अशा महान नेत्याशी मोदींची केलेली तुलना अयोग्य असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी यांनी म्हटले आहे.