मी जेव्हा वर जाईन तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना ठामपणे सांगू शकीन की मी चांगले काम केले आहे. पण तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर द्याल असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत. मोदींच्या या चिमट्यानंतर नोटाबंदीवरुन शिवसेनेचा विरोध मावळला असून नोटाबंदीविरोधात संसदेच्या आवारात निघणा-या सर्वपक्षीय मोर्चात सहभागी होण्याविषयी निर्णय घेऊ असे सांगितले.

नोटाबंदीच्या निर्णयाने त्रस्त झालेले सर्वसामान्य आणि शेतकरी वर्ग, जिल्हा सहकारी बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी घातलेली बंदी अशा विविध मुद्यांसंदर्भात शिवसेना खासदारांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत नरेंद्र मोदींनी शिवसेना खासदारांनाच चिमटे काढले. तुमचा विरोध असला तरी तुम्हाला आमच्यासोबतच राहायचे आहे असेही त्यांनी शिवसेनेच्या खासदारांना सांगितले.  नोटाबंदीच्या निर्णयाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतक-यांचा अपमान करु नका, शेतक-यांवर बंधन लादली तर राज्यात पुन्हा आत्महत्येचे सत्र होईल अशी भीती शिवसेना खासदारांनी मोदींकडे व्यक्त केली.

नोटाबंदीवरुन शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून यावरुन शिवसेनेने नोटाबंदीवरुन भाजपवर टीका केली आहे. नोटाबंदीविरोधात ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या मोर्चात शिवसेना नेत्यांनी सहभाग घेत केंद्र सरकारला घरचा आहेर दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी शिवसेनेच्या खासदारांना खडेबोल सुनावले आहेत.

नरेंद्र मोदींनी टीका केल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदींच्या मनात बाळासाहेबांविषयी असलेल्या आदराबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे ते म्हणालेत. पण नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असून त्यांनी जनतेला भेडसावणा-या प्रश्नांचे त्यांनी उत्तर देणे अपेक्षित आहे. उत्तर मिळाल्यावर सर्वसामान्यांचे जीवन सुरळीत झाल्यास बाळासाहेबांना आनंद होईल. बाळासाहेब हे सर्वसामान्यांचे नेते होते असे सांगत त्यांनी मोदींना टोला लगावला आहे.