लाहोर : पाकिस्तानात पंजाब प्रांतातून किशोरवयीन शीख मुलीचे अपहरण करून तिचे इस्लाममध्ये धर्मातर करून मुस्लीम व्यक्तीशी विवाह केल्याचे प्रकरण आता मिटले आहे कारण या मुलीच्या सासू-सासऱ्यांनी तिला तिच्या आई-वडिलांकडे जाण्याची परवानगी दिली आहे.

भारतातील शीख समुदायाने हे प्रकरण लावून धरल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यात आला. त्यामुळे ही मुलगी आता सुरक्षितपणे आई-वडिलांकडे परतणार आहे. यात पाकिस्तानी राजकीय नेत्यांनीही हस्तक्षेप करून समझोता घडवून आणण्यात मोठी भूमिका पार पाडली.

पंजाब प्रांताचे राज्यपाल महंमद सरवर यांनी या दोन्ही कुटुंबांसमवेत चित्रफीत संदेश जारी केला असून पाकिस्तानी व शीख समुदायासाठी ही आनंदाची बातमी असल्याचे म्हटले आहे. नानकाना साहिब येथील मुलीच्या धर्मातराचा प्रश्न निकाली निघाला असून आता ही मुलगी सुखरूप तिच्या घरी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.  हा वाद निकाली काढण्यात आल्याचे  शीख मुलगी व मुस्लीम मुलगा यांच्या कुटुंबीयांच्या वक्त व्यातून स्पष्ट झाले आहे. तिला वाटत असेल तर ती आई-वडिलांकडे जाण्यास मुक्त आहे, असे मुलाच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले. दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांना आलिंगन दिल्याचे चित्रफितीत दिसत आहे. शीख मुलीचे सहाजणांनी अपहरण करून तिचे सक्तीने इस्लाममध्ये धर्मातर करून मुस्लिमाशी विवाह लावल्याच्या प्रकरणी नानकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जगजीत कौर असे या एकोणीस वर्षीय मुलीचे नाव असून तिचे वडील शीख धर्मगुरू आहेत.

हिंदू मुलीच्या धर्मातराची पाकिस्तानात दुसरी घटना

इस्लामाबाद : पाकिस्तानातील सिंध प्रांतात आणखी एका हिंदू मुलीचे अपहरण करून तिचे सक्तीने धर्मातर करण्याची घटना घडली आहे. तिचा ठावठिकाणा समजलेला नाही. गेल्या आठवडाभरात अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. या मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी ही बीबीएची विद्यार्थिनी असून २९ ऑगस्टला महाविद्यालयात जाण्यासाठी बाहेर पडली ती परतलीच नाही. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास  भाग पाडण्यात आले. तिला बाबर अमान व पाकिस्तान तेहरीक ए इन्साफचा सदस्य मिर्झा दिलावर बेग यांनी पळवून नेले. नंतर तिला बेगच्या निवासस्थानी ठेवून धर्मातर केले व तिचा विवाह बाबर अमान याच्याशी लावण्यात आला. पोलिसांनी बाबर अमान याच्या भावाला अटक केली असली तरी बाबर व ती मुलगी यांचा ठावठिकाणा सापडलेला नाही. पाकिस्तानातील ऑल पाकिस्तान हिंदू पंचायत या संघटनेने या घटनेचा निषेध केला आहे.