देशातील करोनाचा प्रादुर्भाव अजूनही नियंत्रणात नसल्याचीच जाणीव करून देणारी आकडेवारी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून देशात करोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाल्याची स्थिती आहे. दररोज ७५ हजारांपेक्षा जास्तीच्या सरसरीनं बाधित रुग्ण आढळून येत असून, मंगळवारी या आकड्यात दिलासादायक घट झाली होती. मात्र पुन्हा मागील २४ तासात रुग्णसंख्येचा आलेख वरच्या दिशेकडे वळला आहे. चिंताजनक बाब म्हणजे मृतांची संख्याही एक हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भय इथले संपत नाही, अशीच परिस्थिती देशात दिसत आहे.

देशातील करोना रुग्णसंख्येत बुधवारी मोठी वाढ झाली. गेल्या २४ तासांत देशात ७८,३५७ जण करोना बाधित आढळून आले. तर याच कालावधीत देशात १ हजार ५४ जणांचा संसर्गानं मृत्यू झाला. नव्या रुग्णांमुळे देशातील करोना बाधितांची एकूण संख्या ३७ लाख ६९ हजार ५२४ इतकी झाली आहे. म्हणजे ३८ लाखांच्या उंबरठ्यावर हा आकडा पोहोचला आहे. यात ८ लाख १ हजार २८२ रुग्ण सध्या देशभरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर २९ लाख १ हजार ९०९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत करोनामुळे ६६ हजार ३३३ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जाहीर केली आहे.

मंगळवारची आकडेवारी होती दिलासादायक

मंगळवारी मागील २४ तासातील आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. ही आकडेवारी दिलासा देणारी होती. नव्यानं आढळून आलेल्या रुग्णसंख्येत आणि मृतांच्या आकड्यात मोठी घट झाल्याचं बघायला मिळालं होतं. ६९ हजार ९२१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर ८१९ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यानंतर २४ तासातच नवीन रुग्णसंख्येच्या आकड्यानं उसळी मारली आहे. मंगळवारच्या तुलनेत जवळपास साडे आठ हजार जास्तीच्या रुग्णांची वाढ झाली आहे.