रशियात करोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली असून तेथे वैद्यकीय यंत्रणेवर ताण वाढला आहे. रुग्णांना मोफत खाटा मिळणे आता मुश्किल झाले आहे.

उरल पर्वतराजीत काम करणाऱ्या परिचारिका येकाटेरिना कोबझेवा यांना अचानक श्वास घेणे कठीण झाले, त्यांनी रुग्णवाहिका बोलवली पण त्यांना रुग्णालयात प्रवेश मिळाला नाही. या परिचारिकेची फुप्फुसे पन्नास टक्के खराब झाली होती. सात रुग्णालये फिरूनही त्यांना प्रवेश मिळाला नाही. रशियातील आरोग्य यंत्रणा मोठी असली तरी तेथे निधीची कमतरता आहे. त्यामुळे या परिचारिकेच्या व्यथेची मोठी बातमी स्थानिक वृत्तपत्रांनी दिली आहे. देशात ८१ टक्के खाटा करोना रुग्णांसाठी असून त्या बुधवापर्यंत भरल्या आहेत. रशियात दैनंदिन मृत्यूंची संख्या विक्रमी असून १ ऑक्टोबरला दर लाख लोकांमागे संसर्गाचे प्रमाण ६ होते ते आता १५ झाले आहे. रशियात २० लाख रुग्ण असून ३५ हजार बळी गेले आहेत. पण तज्ज्ञांच्या मते हे आकडे कमीच आहेत. रशियन माध्यमांनी म्हटले आहे की, रुग्णालयांच्या मार्गिका रुग्णांनी भरल्या आहेत. अनेक मृतदेह प्लास्टिकच्या पिशव्यात भरून शवागारात ठेवले आहेत. रुग्णवाहिकांच्या मोठय़ा रांगा दिसत असून औषधांच्या अनेक दुकानांमध्ये औषधे शिल्लक उरलेली नाहीत.