भारत व चीन यांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यात सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाच कलमी कराराच्या अंमलबजावणीवर सोमवारी चर्चा करण्यात आली. दोन्ही देशात पूर्व लडाखमधील तणावाची स्थिती कमी करण्यासाठी पाच कलमी कराराला मान्यता देण्यात आली होती. सहाव्या फेरीतील चर्चेला सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या बाजूकडील मोल्दो येथे झालेल्या चर्चेचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी केले. ते लेह येथील १४ व्या कमांडचे प्रमुख आहेत. चर्चा करणाऱ्या पथकात परराष्ट्र मंत्रालयाचे सह सचिव पातळीचे अधिकारी व नंतर हरिंदर सिंग यांच्या जागी नेमणूक होणार असलेले  लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन सहभागी होते. १४ व्या कमांडच्या प्रमुखपदाची सूत्रे पुढील महिन्यापासून मेनन सांभाळणार आहेत. चीनच्या दक्षिण शिनजियांग लष्करी भागाचे कमांडर मेजर जनरल लिउ लिन यांनी चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर व चीनचे समपदस्थ वांग यी यांच्यात शांघाय सहकार्य संस्थेच्या निमित्ताने मॉस्कोत चर्चा झाली होती. त्या वेळी तणाव कमी करण्यासाठी पाच कलमी करारास मान्यता देण्यात आली होती. १० सप्टेंबरला ही चर्चा झाली होती, त्या अनुषंगाने सहाव्या फेरीत मुद्दे मांडण्यात आले. त्यात चार महिन्यांचा हा पेच मिटवण्यासाठी तातडीने सैन्य माघारी घेणे, सीमा व्यवस्थापनाचे नियम लागू करणे, शांतता प्रस्थापित करणे या बाबींचा समावेश होता. पूर्व लडाखमध्ये आता नव्याने हवाई दलात समाविष्ट केलेली राफेल विमाने फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे युद्धसज्जता कायम आहे. राफेल विमाने हवाई दलात आल्यानंतर दहा दिवसात ती पूर्व लडाख भागात तैनात करण्यात आली. पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागात सैन्यबळ कायम ठेवण्यात आले आहे. हिवाळ्यात या भागातील तापमान उणे २५ अंशंपरयत खाली जाते. पँगाँग सरोवराच्या दक्षिण व उत्तर किनाऱ्यावर तणाव कायम असून चीनचे लक्ष्य प्रत्यक्षात देपसांग असल्याचे दिसून येते. गेल्या तीन आठवडय़ात ४५ वर्षांनंतर सीमेवर प्रथमच चिनी सैन्याने भारतीय सैनिकांना घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार केला होता. २९ व ३० ऑगस्टच्या रात्री चीनने पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ७ सप्टेंबरला चिनी सैन्य मुखपारी, रिझांग ला या ठिकाणी जवळ आले होते आता फिंगर २, फिंगर ३ भागात भारताचे सैन्य वर्चस्व ठेवून आहे. चीनने फिंगर ४ व फिंगर ८ भागात वर्चस्व निर्माण केले आहे.