भारताचा अंतर्गत विषय असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर आता पाकिस्तानने देखील आपलं नाक खुपसलं आहे. पाकिस्तानच्या एका मंत्र्याने या शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं असून भारतीय शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. “गुजराती हिंदुत्व ही प्रेरणा असलेल्या भाजपा सरकारला पंजाबी शेतकऱ्यांची काळजी नाही”, अशा शब्दांत इम्रान खान सरकारमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री असलेल्या चौधरी फवाद हुसैन यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.

हुसैन म्हणाले, “शेतकरी आंदोलनाचा आज १२ वा दिवस आहे आणि तरीही दिल्ली अजून त्यांचं ऐकण्याच्या तयारीत नाही. भावनाशून्य मोदी सरकारचे शेतकऱ्यांचे लक्ष नाही. गुजराती हिंदुत्व ही प्रेरणा असलेल्या भाजपा सरकारला पंजाबी शेतकऱ्यांची काळजी नाही. पंजाबी नागरिकांविरोधातील भारतीय सरकारची धोरणं लाजीरवाणी आहेत. सीमेपलिकडील माझ्या पंजाबी शेतकरी बांधवांसाठी माझं हृदय तुटत आहे.”

आणखी वाचा- लंडन : शेतकरी समर्थनार्थ आंदोलनात दिसला भारतविरोधी अजेंडा; फडकले खलिस्तानी झेंडे

पाकिस्तानी नागरिकांनी पंजाबी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवावा असं आवाहनही पाकिस्तानी मंत्री हुसैन यांनी केलं आहे. दुसऱ्या एका ट्विटमधून ते म्हणाले, “कुठेही अन्याय होणं म्हणजे सगळीकडे न्यायाला धोका असणं होय. पंजाबी शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायावर आपल्याला बोलायला हवं. मोदी सरकारची धोरणं ही या संपूर्ण पंजाब प्रांतासाठी धोकादायक आहेत.” मोदींच्या अत्याचाराला कोणी विरोध केला तर त्याला पाकिस्तानी एजंट ठरवलं जातं, असा आरोपही हुसैन यांनी आपल्या ट्विटवर आलेल्या एका कमेंटला प्रतिक्रिया देताना केला.