केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. संसदेत कायदे मंजूर केल्यापासून शेतकरी राज्यांमध्येच आंदोलन करत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. तर काही संतप्त शेतकऱ्यांनी सरकारचे पर्याय नाकारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळाही जाळला होता. दरम्यान, सिंधू सीमेवरच आंदोलन कायम राहणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं आहे.

“आज शेतकरी आणि सरकारची स्थिती भारत पाकिस्तानप्रमाणे झाली आहे. जसं निवडणुकांच्या वेळी नेते शेतकऱ्यांच्या घरांमध्ये शेतांमध्ये मतं मागायला जाता, तशाचप्रकारे त्यांच्या समस्यांवरही चर्चा करा,” असं अण्णा हजारे म्हणाले.

“आज शेतकरी अहिंसेच्या मार्गांनं आंदोलन करत आहेत. परंतु जेव्हा त्यांच्या हातून काही हिंसाचार घडला तक त्याची जबाबदारी कोण घेणार. शेतकरी पाकिस्तानी नाहीत. सरकारनं त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे,” असंही ते म्हणाले. यावेळी अण्णा हजारे यांनी केंद्रावर निशाणा साधला. “शेतकरी इतक्या दिवसांपासून आंदोलन करत आहेत हे देशाचं दुर्देव आहे. जे शेतकरी आंदोलन करत आहेत ते पाकिस्तानी नाहीत. आपल्याच देशातील आहेत. निवडणुकांच्या दरम्यान जसं तुम्ही मतं मागण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत शेतापर्यंत जाता तसं आता त्यांच्या समस्याही सोडवा,” असंही ते म्हणाले.

“शेतकऱ्यांवर जो पाण्याचा मारा करण्यात आला तो अयोग्य होता. आज शेतकऱ्यांसोबत जे काही घडत आहे ते भारत पाकिस्तान संघर्षाप्रमाणे झालं आहे. शेतकरी देशाचे शत्रू नाहीत. त्यांच्या आंदोलनातून मार्ग काढणं आवश्यक आहे. सरकारनं त्यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढायला हवा,” असंही अण्णा हजारे म्हणाले.