19 March 2019

News Flash

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी

एका हाताच्या काही बोटांची हालचालच त्यांना करता येत होती

वयाच्या २१व्या वर्षी त्यांना ‘एएलएस’ आजाराने ग्रासले.

ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झालं. वयाच्या २१व्या वर्षी त्यांना ‘एएलएस’ आजाराने ग्रासले, शारीरिक अपंगत्त्व आलं त्यामुळे हालचालींवर बंधनं आली, कायमस्वरूपी खुर्चीला खिळून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली पण आपल्या शारीरिक अपंगत्त्वाला त्यांनी कधीच यशाच्या मार्गातला अडसर बनू दिला नाही. आपल्या व्हिलचेअरलाच आपली ताकद मानली. विश्वाची निर्मिती कशी झाली.. आकाशातील कृष्णविवरे नेमकी कशी तयार होतात? अशा ब्रह्मांडातल्या अनेक न उकलणाऱ्या गूढ रहस्यांचा शोध घेण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि असामान्य बुद्धीकौशल्याच्या जोरावर माणूस जग जिंकू शकतं हे त्यांनी साऱ्या जगाला दाखवून दिलं अशा ख्यातनाम शास्त्रज्ञाबद्दल काही रंजक गोष्टी

-स्टीफन हा अत्यंत असामान्य बुद्धीचा वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी होता. वयाच्या २१व्या वर्षी त्यांना ‘एएलएस’ आजाराने ग्रासले. ते फार फार तर दोन वर्षे जगू शकतील अशी भीती डॉक्टरांनी वर्तवली पण असामान्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपल्या आजारपणावर मात करत ख्यातनाम शास्त्रज्ञ अशी ख्याती जगभर मिळवली.
– महाविद्यालयात त्या काळी ठराविक पद्धतीचे कपडे घालण्याची प्रथा होती पण, स्टीफन यांना साचेबद्ध आयुष्य जगणं पसंत नव्हतं ते नेहमीच रंगीबेरंगी कपडे घालून महाविद्यालयात यायचे.
– शाळेत असताना त्यांना ‘आइनस्टाइन’ या टोपन नावानं ओळखलं जायचं.
– शाळेत हॉकिंगला ‘आइनस्टाइन’ असं ओळखलं जात असलं तरी काही संदर्भानुसार हॉकिंग यांचे शाळेतील गुण मात्र एका सरासरी विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षाही कमी होते.
– ‘प्रॉपर्टीज ऑफ एक्स्पांडिंग युनिव्हर्स’ हा त्यांचा प्रबंध गेल्यावर्षी केंब्रिजनं ऑनलाइन प्रसिद्ध केला होता. हा प्रबंध इतका हिट ठरला की जगभरातील लाखो लोकांनी प्रकाशित होताच तो डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला आणि केंब्रिजची वेबसाईट अक्षरश: क्रॅश झाली होती.
– वेदना असह्य़ झाल्या आणि आपण आप्तांसाठी ओझे आहोत असे वाटू लागले किंवा आपल्याकडून आता जगाला देण्यासारखे काही उरलेले नाही याची खात्री पटली, तर वैद्यकीय मदतीने आत्महत्येचा मार्ग पत्करण्याचा विचार करू अशीही इच्छा त्यांनी गेल्यावर्षी एका मुलाखतीत व्यक्त केली होती.

– शाळेत असताना आपल्या काही वर्गमित्रांच्या मदतीनं त्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करून चक्क कॉम्प्युटर तयार केला होता.
– ब्रम्हांडातल्या अनेक गुढ गोष्टींची उकल करणाऱ्या या शास्त्रज्ञाला जेव्हा एका मुलाखतीत विश्वातील सर्वात गुढ गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारला होता तेव्हा ‘स्त्री’ ही जगातील सर्वात गूढ गोष्ट असल्याचं मत त्यांनी मांडलं होतं.
– आजारपणामुळे त्यांचा शरीरिक हालचाली बंद झाल्या, फक्त त्यांना एका हाताच्या काही बोटांची हालचाल करता येत होती.
– स्टीफन यांनी लहान मुलांसाठी लिहिल्या गेलेल्या अनेक पुस्तकांसाठी साहाय्य देखील केलं.
– २००७ साली स्टीफन यांनी शून्य गुरूत्त्वाकर्षण शक्तीचा अनुभव घेतला. त्यावेळी कित्येक वर्षींनी प्रथमच ते आपल्या व्हिलचेअरवरून उठले होते आणि हवेत तरंगण्याचा सुंदर अनुभव घेतला होता.
– एलियन्स असू शकतात असं मानणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी स्टीफन एक होते.

First Published on March 14, 2018 10:43 am

Web Title: some interesting facts about stephen hawking in marathi