काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी जवळपास दोन वर्षांनी निवडणूक प्रचारसभेत सहभागी होणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या काँग्रेस आणि भाजपा प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर ताशेरे ओढत असताना आता सोनिया गांधीही मैदानात उतरणार आहेत. बिजापूर येथे दुपारी चार वाजता सोनिया गांधींची प्रचारसभा पार पडणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ही त्यांची पहिलीच प्रचारसभा असणार आहे.

कर्नाटकमध्ये आपली सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेस सर्वोपतरी प्रयत्न करत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी रोज प्रचारसभांसोबत दौरा करत लोकांशी संवाद साधत आहेत. सोमवारी राहुल गांधी यांच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीआधी २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसीत रोड शो दरम्यान सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी त्यांना एअरलिफ्ट करत तात्काळ दिल्लीला नेण्यात आलं होतं. यानंतर सोनिया गांधी यांनी निवडणूक आणि प्रचारापासून आपल्याला थोडं लांबच ठेवलं होतं.

सोनिया गांधी बिजापूरमध्ये सभा घेणार असून, राहुल गांधी यांची तुमकूर जिल्ह्यात सभा पार पडणार आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभादेखील पार पडणार आहेत. विजयपुरा, कोप्पल आणि बंगळुरु येथे त्यांच्या सभा पार पडतील. दुसरीकडे भाजपाध्यक्ष अमित शाह मंगळुरु मतदारसंघात रोड शो करणार आहेत.