आयुष्यभर ज्या मनुवादाच्या विरोधात घटनाकार डॉ. आंबेडकर लढले त्याच मनुवादाला बळ देण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकार व संघाचे लोक करीत आहेत.  एकीकडे आरक्षण समाप्त झाले पाहिजे, असे म्हणतात व दुसऱ्याच दिवशी त्यांच्यातील कुणीतरी म्हणतो, नाही नाही आरक्षण असले पाहिजे, यावरून यांची भूमिका स्पष्ट होते. यांना आरक्षण संपवायचे आहे असा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथील सभेत केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांची सांगता कस्तुरचंद पार्कवरील सभेने करण्यात आली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

मोदी हे डॉ. आंबेडकर यांचे प्रशंसक असल्याचा दावा करतात. दुसरीकडे, दलित, आदिवासींच्या योजनांच्या निधीत मोठी कपात करतात, हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप सोनियांनी केला. त्यातून रा.स्व.संघ आणि भाजपची मागासवर्गीयांप्रती दुटप्पी भूमिका चव्हाटय़ावर आल्याचे सोनियांनी सांगितले.

सरकारचे षड्यंत्र

लोकशाही पद्धतीने निवडून आलेली काँग्रेसची सरकारे बरखास्त करण्याचे षड्यंत्र विद्यमान सरकारचे असून डॉ. आंबेडकरांची घटनाच पायदळी तुडवण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचे सोनियांनी उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशातील उदाहरणे देऊन सांगितले.

गरिबांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न – राहुल गांधी</strong>

आयुष्यभर ज्या मनुवादाविरोधात घटनाकार डॉ. आंबेडकरांनी लढले त्याच मनुवादाला पुन्हा आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार व संघाचे लोक करीत असून देशातील दलित, आदिवासींचा, तसेच गरिबांचा आवाज दाबण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याची घणाघाती टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सभेत केली. देशात आरक्षण आणि शिक्षणापासून लोकांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे.