बहुतांश वेळेस ‘एटीएम’मध्ये कॅश नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतं. पण आता जर 3 तासाहून अधिक काळ एखाद्या एटीएममध्ये कॅश नसेल तर संबंधित बँकांना दंड ठोठाविण्याच्या तयारीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आहे. इंग्रजी वृत्तपत्र डीएनएने सुत्रांच्या सहाय्याने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबतचे परिपत्रक देखील आरबीआयने सर्व बँकांना पाठवले आहे.

छोटी शहरे आणि ग्रामीण भागांतील एटीएममध्ये कित्येक दिवस पैसेच उपलब्ध नसतात. विनाकारण नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागतो. तरीही अनेकदा बँका याकडे दुर्लक्ष करतात. पण आता याविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आरबीआय आहे. यानुसार कोणतंही एटीएम तीन तासांपेक्षा अधिक काळ कॅशलेस नसावं, जर कॅश संपली असेल तर तीन तासांच्या आत संबंधित बँकेनी त्या एटीएममध्ये पैशांचा भरणा करावा अन्यथा बँकेवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

एटीएममधील सेंसरद्वारे कळतं किती कॅश बाकी –
एखाद्या एटीएममध्ये कॅश आहे किंवा नाही याची माहिती बँकांना मिळत असते. किती रक्कम शिल्लक आहे आणि किती वेळात पैसे संपतील म्हणजेच कधीपर्यंत पैशांचा भरणा करावा याबाबत माहिती देखील संबंधित बँकांना मिळत असते. एटीएममध्ये लावलेल्या सेंसरद्वारे बँकेला रियल टाईमवर किती रक्कम उपलब्ध आहे याची माहिती मिळते.