करोनानं जगात काय थैमान घातलंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. भारतातही करोनानं प्रवेश केला असून, शहरांपासून गावखेड्यापर्यंत करोनाविषयी भीती निर्माण झाली आहे. झपाट्यानं पसरत असलेल्या करोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी जगभरातील देश वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना एक हादरवणारी माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात महिला टी-२० विश्वचषकातील शेवटचा सामना झाला. या सामन्याला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्ये एक जण करोनाग्रस्त होता. त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं आता खळबळ उडाली आहे.

महिला टी-२० विश्वचषकातील अंतिम सामना मेलबर्न येथे खेळविण्यात आला. या सामन्याला तब्बल ८६ हजार प्रेक्षक उपस्थित होते. या गर्दीतच एक करोना संशयित होता. त्याची तपासणी करण्यात आली असून, संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मेलबर्न क्रिकेट मैदान व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी याविषयी माहिती दिली. ८ मार्च रोजी झालेल्या महिला टी-२० विश्व चषकाचा सामना बघायला आलेला करोना संशयित होता. त्याची तपासणी करण्यात आली असून, अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असं प्रशासनानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. मात्र, ८६ हजार लोकांमध्ये हा रुग्ण वावरल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

परदेशातून आलेल्या बहुतांश लोकांनाच करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानं केंद्र सरकारनं तातडीनं काही पावलं उचलली आहेत. यात परदेशी नागरिकांच्या व्हिसावर १५ एप्रिलपर्यंत मर्यादा घालण्यात आली आहे. याचा फटका भारतात होऊ घातलेल्या आयपीएल स्पर्धेबरोबर आशियाई बॅडमिंटन स्पर्धेला बसणार आहे. त्याचबरोबर गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्यानं स्पर्धा घ्यायच्या की नाही, असा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे.