एमव्ही एसएसएल कोलकाता या मालवाहू जहाजाला पाण्याच्या प्रवाहात वाहत जाण्यापासून रोखण्यासाठी शनिवारी सकाळी भारतीय नौदलाने एक धाडसी ऑपरेशन केले. नौदलाचे स्पेशल मार्कोस कमांडो सी किंग ४२ हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने एमव्ही एसएसएल कोलकातावर उतरले व पाण्याच्या प्रवाहात वाहत चाललेल्या या जहाजाला रोखले.

कृष्णपटनम येथून निघालेल्या एमव्ही एसएसएल जहाजाला बुधवारी बंगालच्या सागरात आग लागली. जहाजावरील कंटेनरने पेट घेतला. खराब हवामान आणि वेगाने वारे वाहत असल्यामुळे आग वेगाने पसरली. सुदैवाने सर्वच्या सर्व २२ क्रू मेंबर्सची सुखरुप सुटका करण्यात आली. या जहाजावर नियंत्रण करायला आता कोणीच नसल्याने बांगलादेशला लागून असणाऱ्या आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेच्या दिशेने हे जहाज वाहत चालले होते.

आधी एक मार्कोस कमांडो ४२ सी हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने जळत्या मालवाहू जहाजावर उतरला. त्याने जहाजाची पाहणी केली त्यानंतर अन्य तीन सहकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर या कमांडोसनी जहाजावरील नांगर समुद्रात टाकला त्यामुळे आता हे जहाज प्रवाहाबरोबर पुढे वाहत जाणार नाही. त्यानंतर हे चारही कमांडो हॅलिकॉप्टरच्या मदतीने पुन्हा आपल्या बेसवर परतले. हे जहाज बुडाल्यास समुद्र पर्यावरणाला मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे हे जहाज बुडण्यापासून रोखण्याला पहिली प्राथमिकता असेल. आज नौदलाच्या कमांडोंनी केलेले हे ऑपरेशन यशस्वी ठरले आहे.