पौराणिक मालिकेतील काही दृश्ये पाहून प्रभावित झालेल्या लखनऊ मधल्या एका मुलाने खेळताना त्यातले एक दृश्य स्वत: करून पाहण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात त्याला आपला जीव गमवावा लागला. राजन असे त्याचे नाव असून तो १४ वर्षांचा होता. लहान बहिण आणि इतर मुलांसोबत खेळताना काही मुलांनी त्याला मालिकेतल्या काली मातेची नक्कल करण्यास प्रोत्साहन दिले.

ही मुले पौराणिक कथेवर आधारित खेळ खेळत होती. काही मुलांनी राजनला काली मातेची भूमिका करण्याचा आग्रह केला. तसेच काली मातेसारखी जीभ बाहेर ठेवून नाटुकलं सादर करायला इतर मुलांनी त्याला सांगितले. खेळताना घरातून आणलेली ओढणी त्याने आपल्या गळ्याभोवती घट्ट गुंडाळली आणि त्याचे एक टोक दरवाज्याच्या खुंटीला अडकवले. त्यामुळेच त्याच्या गळ्याला फास बसला असल्याची माहिती लखनऊचे पोलीस अधिक्षक मिश्रा यांनी दिली.

मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार राजन हा नववीत शिकतो. राजनला तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.