शाळकरी मुलांनी एका तिशीतल्या महिलेचे नग्नावस्थेतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने त्या महिलेने आत्महत्या केली. पश्चिम बंगलाच्या मिदनापूर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. मागील आठवड्यात चार जणांनी या महिलेचे नग्नावस्थेतले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या चौघांपैकी तिघेजण शाळकरी विद्यार्थी आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्याची  बाब या महिलेला समजली. त्यानंतर महिलेने १७ मार्चला तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली अशीही माहिती पुढे आली आहे.

या महिलेचे न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती. या सुसाइड नोटमध्ये चार मुलांनी माझे नग्नावस्थेतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे या महिलेने म्हटले आहे. या चौघांवरही महिलेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक व्ही सोलोमन नेसाकुमार यांनी ही माहिती दिली. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

चंदन गुचैत हा २१ वर्षांचा मुख्य आरोपी आहे. तर इतर तिघेजण शाळकरी विद्यार्थी आहेत. जिल्हा न्यायालयाने या सगळ्यांना दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन महिन्यांपूर्वी पीडित महिला आपल्या मुलीसोबत तिच्या शाळेत गेली होती. त्यावेळी या महिलेचा मोबाइल हरवला होता. त्यानंतर दहावीत शिकणाऱ्या एका मुलाला तो सापडला. त्या मुलाने हा फोन महिलेला परत केला. मात्र त्यातले काही खासगी फोटो त्या विद्यार्थ्याने स्वतःच्या मोबाइलमध्ये ट्रान्सफर केले होते असाही आरोप करण्यात आला आहे.

तसेच आत्महत्या केलेल्या महिलेच्या भावाने दहावीतला तो मुलगा महिलेला या फोटोंच्या आधारे शारिरीक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करत होता असाही आरोप केला आहे. यासाठी या महिलेला त्या मुलाने फोन केला होता आणि शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली होती असेही तिच्या भावाने म्हटले आहे. तसेच या सगळ्याला महिलेने नकार दिला त्यावेळी तुझे न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करेन अशी धमकी या विद्यार्थ्याने तिला दिली. या मुलाने आणि त्याच्यासोबतच्या इतर विद्यार्थ्यांनी त्यांची धमकी खरी करून दाखवली आणि म्हणूनच माझ्या बहिणीने आत्महत्या केली असा आरोप या महिलेच्या भावाने केला.

या प्रकरणातले तीन शाळकरी विद्यार्थी हे तीन वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकतात. मात्र हे तिघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. त्यांचे मोबाइल जेव्हा पोलिसांनी जप्त केले तेव्हा पोलिसांना त्या फोनमध्ये आत्महत्या केलेल्या महिलेच्या काही खासगी फोटोंसह त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या काही मुलींचेही खासगी फोटो आढळले आहेत. दरम्यान या मुलांच्या वकिलांनी असे म्हटले आहे की या प्रकरणात अडकलेले चार पैकी तिघेजण अल्पवयीन आहेत यासंबंधीची कागदपत्रे आम्ही कोर्टात सादर करणार आहोत.

पीडित महिलेचा पती ओदिशामध्ये काम करतो त्याचमुळे ही महिला आपल्या तीन मुलांसह चंदीपूरमध्ये राहात होती. तीन शाळकरी मुलांनी तिचे न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने तिने आयुष्य संपवले आहे.