जम्मू-काश्मीर पोलिसांनी आपल्याला अमानुष मारहाण केल्याचा आरोप श्रीनगरमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या NIT काही विद्यार्थ्यांनी केला आहे. हे सर्व विद्यार्थी परराज्यांतील आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे पुन्हा एकदा शैक्षणिक संस्थांमधील खदखद पुढे आली आहे. संस्थेत शिकणारे काश्मिरी विद्यार्थी आणि परराज्यातील विद्यार्थी यांच्यात वादविवाद झाल्यानंतर हा प्रकार घडला आहे.
गेल्या आठवड्यात टी २० वर्ल्डकप स्पर्धेमध्ये वेस्ट इंडिजने भारतावर विजय मिळवल्यावर काश्मिरी विद्यार्थ्यांनी जल्लोष केला होता. त्यानंतर या दोन्ही गटांमध्ये वादाची ठिणगी पडली. काश्मिरी विद्यार्थी देशविरोधी असल्याचा आरोप परराज्यांतील विद्यार्थ्यांनी केला. त्याचवेळी या सगळ्याचा निषेध करण्यासाठी सोमवारपासून या विद्यार्थ्यांनी संस्थेतील तासांवर बहिष्कार घातला. त्यानंतर मंगळवारी त्यांनी संस्थेच्या आवारात रॅली काढल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. यामुळे पुन्हा एकदा संस्थेच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारत- वेस्ट इंडिज यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यातील भारताच्या पराभवानंतर काही काश्मिरी विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा देत फटाके फोडल्याचा आरोप इतर राज्यांतील विद्यार्थ्यांनी केला. या घटनेनंतर एनआयटी प्रशासनाकडून महाविद्यालयाचा परिसर बंद ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांना वसतीगृह सोडण्याचे आदेश दिले आहेत. संस्थेतील काही विद्यार्थ्यांनी शुक्रवारी एकत्र येत आदल्या रात्री घडलेल्या घटनेबाबत संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर काही स्थानिक विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या. तसेच वसतिगृहातील खोल्यांमध्ये टेलिव्हिजनवर हा सामना बघणाऱ्या परराज्यांतील विद्यार्थ्यांना मारहाणही केल्याचा दावा येथील एका विद्यार्थ्याने केला होता.