माहितीच्या महाजालात प्रात:स्मरणीय असलेल्या गुगल या कंपनीच्या सर्वोच्च पदावर सुंदर पिचाई या मूळ भारतीय असलेल्या तरुणाची नियुक्ती करण्यात आली आहे. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांनी मंगळवारी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. तामिळनाडूत जन्मलेले पिचई खरगपूर आयआयटीचे विद्यार्थी असून २००४ पासून ते गुगलमध्ये कार्यरत आहेत.
गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी गुगलची फेररचना केली आहे. त्यानुसार आता अल्फाबेट ही नवीन उपकंपनी गुगल स्थापन करणार असून पेज व ब्रिन हे या नव्या कंपनीचे अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष असतील. गुगलची फेररचना करताना पेज यांनी पिचई यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती केली. २००४ मध्ये गुगलमध्ये रुजू झालेल्या पिचाई यांनी आतापर्यंत कंपनीत विविध पदांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. २००८ मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली गुगल क्रोम ही नवी प्रणाली स्थापन करण्यात आली. क्रोमच्या यशानंतर जीमेल अ‍ॅपचेही काम पिचई यांच्याकडे आले. त्यानंतर ते अँड्रॉइडचे प्रमुख झाले. अँड्रॉइड ही गुगलची मोबाइल फोन संचालन प्रणाली आहे.
पंतप्रधानांकडून कौतुक
सुंदर पिचई यांची गुगलच्या सीईओपदी नियुक्ती जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे ट्विटरवरून अभिनंदन केले. पुढील महिन्यातच पंतप्रधान अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीला भेट देत आहेत. या पाश्र्वभूमीवर पिचई यांची नियुक्ती विशेष अभिनंदनीय ठरली आहे.
भारतीयांचा डंका
पिचई यांच्या नियुक्तीने प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर बलाढय़ कंपन्यांच्या सर्वोच्चपदी विराजमान होण्याच्या भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

गुगल : सुंदर पिचाई
मायक्रोसॉफ्ट : सत्या नाडेला
मास्टरकार्ड : अजय बंगा
पेप्सिको : इंद्रा नूयी
नोकिया : राजीव सुरी
डॉइश बँक : अंशू
जैन (अलीकडच्या काळापर्यंत त्या
सहसीईओ होत्या)

सुंदर यांची कार्यशैली वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी कंपनीसाठी दिलेले योगदान खरोखरच कौतुकास्पद आहे. गेल्या वर्षी आमच्या इंटरनेट व्यवसायवृद्धीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांनी त्यात केलेली प्रगती आणि कामाप्रती असलेली सुंदर यांची निष्ठा वादातीत आहे. त्यामुळेच कंपनीची धुरा त्यांच्याकडे सोपवण्याचा आम्ही निर्णय घेतला.  
– लॅरी पेज, गुगलचे सहसंस्थापक