19 January 2021

News Flash

‘जर तुम्ही दुखावलं आहे, तर मग माफी का मागणार नाही?,’ सुप्रीम कोर्टाचा प्रशांत भूषण यांना सवाल

माफी मागण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, प्रशांत भूषण यांच्या वकिलाच युक्तिवाद

संग्रहित

सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकऱणी दोषी ठरवण्यात आलेले ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास नकार दिला असून सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी त्यांना समज देऊन सोडलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. प्रशांत भूषण यांच्या शिक्षेसंबंधी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. दरम्यान सुनावणीवेळी न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी जर तुम्ही एखाद्याला दुखावत असाल तर चूक मागण्यात गैर काय ? अशी विचारणा केली.

“अजून किती काळ यंत्रणेला हे सहन करावं लागणार आहे? मी येत्या काही दिवसांत निवृत्त होत आहे. तुम्ही किंवा इतरांनी माझ्यावर हल्ला करणं योग्य आहे का ? जर तुम्ही एखाद्याला दुखावलं असेल तर त्यावर फुंकरही मारावी,” असं न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी म्हटलं आहे. न्यायाधीश अरुण मिश्रा प्रशांत भूषण यांचे वकील राजीव धवन आणि अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांच्या युक्तिवादावर बोलत होते.

प्रशांत भूषण यांनी आम्हाला दिलेला प्रतिसाद जास्त मानहानीकारक – सुप्रीम कोर्ट

प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून माफी मागण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तीन दिवसांचा वेळ दिला होता. पण प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास नकार दिला. “मी माफी मागणे ढोंगीपणाचे ठरेल. माझ्या विधानांना मी नाकारले व माफीनामा सादर केला तर स्वत:च्या सदसद्विवेकाशी प्रतारणा करण्याजोगे असेल. मी केलेली विधाने सद्हेतूने केली होती. सर्वोच्च न्यायालय वा विशिष्ट सरन्यायाधीशांचा अपमान करण्यासाठी ही विधाने केलेली नव्हती. न्यायालये लोकांचे हक्क आणि घटनेचे रक्षण करणारी असतात. त्यांच्या या प्रमुख भूमिकेपासून ती दूर जात असतील तर त्यांच्याबद्दल केलेली रचनात्मक टीका होती,” असं प्रशांत भूषण यांनी निवेदनात म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टाने प्रशांत भूषण यांना आपल्या वक्तव्यावर फेरविचार करण्यासाठी सांगितलं असून आपलं वक्तव्य मागे घेण्यासंबंधी विचार करण्यास सांगितलं आहे. प्रशांत भूषण यांचे वकील राजीव धवन यांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाने टीका सहन केली पाहिजे असं मत व्यक्त केलं. माफी मागण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही असंही ते म्हणाले.

माफी मागण्यास प्रशांत भूषण यांचा पुन्हा नकार

न्यायालयाने प्रशांत भूषण यांना काय शिक्षा दिली जावी असं विचारलं असता ते म्हणाले की, “त्यांना शहीद होऊ देऊ नका…न्यायालय शिक्षा काय देईल यावर हा वाद सुरु राहणार आहे. जर न्यायालयाने उदारपणा दाखवला तरच ही वाद संपेल”.

सुप्रीम कोर्टाने यावेळी आपण प्रशांत भूषण यांच्याकडून वेगळ्या निवेदनाची अपेक्षा केली असल्याचं सांगितलं. “प्रशांत भूषण यांचं निवदेन वाचणं वेदनादायी होतं. ते पूर्णपणे चुकीचं होतं. ३० वर्षांहून जास्त अनुभव असणाऱ्या वकिलाची ही वागणूक योग्य नाही. फक्त तेच नाही तर सध्या हे अनेकवेळा पहायला मिळत आहे,” असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 8:14 pm

Web Title: supreme court asks if you hurt someone why not apologise to prashant bhushan sgy 87
Next Stories
1 १० लाख फेसबुक युझर्सची अकाऊंट केली बंद; ‘या’ देशात सरकारविरोधात आंदोलक रस्त्यावर
2 …म्हणून भारतात होतोय करोनाचा महामारीचा फैलाव, ICMR ने सांगितलं कारण
3 करोनामुक्त रुग्णांना पुन्हा होऊ लागलाय संसर्ग, जगासमोर नवं संकट
Just Now!
X