ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून आज शिक्षेवरील सुनावणी पार पडली. यावेळी प्रशांत भूषण यांनी न्यायालयाच्या निर्णयाने आपल्याला प्रचंड वेदना झाल्या असून गैरसमज झाला असल्याचं सांगितलं. न्यायालयाने यावेळी प्रशांत भूषण आपल्या वक्तव्यावर फेरविचार करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला आहे.
न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी यावेळी सांगितलं की, “चूक करणार नाही अशी कोणतीच व्यक्ती जगात नाही. तुम्ही १०० चांगल्या गोष्टी केल्या असतील. पण यामुळे तुम्हाला १० गुन्हे करण्याचा परवाना मिळत नाही. जे झालं ते झालं, पण संबधित व्यक्तीमध्ये पश्चातापाची भावना असली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे”.
प्रशांत भूषण यांनी न्यायालयाकडे सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केलली होती. यावेळी त्यांनी म्हटलं की, “सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत आपल्याला दोषी ठरवल्याने प्रचंड वेदना झाल्या आहेत. हे दुख: मला शिक्षा सुनावणी जाणार असल्याने नाही तर माझ्याबद्दल गैरसमज झाल्याने आहे. मला वाटतं लोकशाही आणि तिच्या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी टीका गरजेची आहे”.
सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी प्रशांत भूषण दोषी, २० ऑगस्टला शिक्षेची सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाने वक्तव्यावर फेरविचार करण्यास सांगितलं असता प्रशांत भूषण यांनी म्हटलं की, “मी कदाचित त्यावर विचार करेन, पण त्यात फार बदल नसेल. मला न्यायालयाचा वेळ घालवण्याची इच्छा नाही. मी माझ्या वकिलांशी चर्चा करेन”. यावर न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी, “तुम्ही पुनर्विचार करणं जास्त चांगलं आहे. फक्त कायदेशीर विचार करु नका”, असा सल्ला दिला.
प्रशांत भूषण यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं की, “मी केलेले ट्विट संस्थेच्या भल्यासाठीच होते. दिलगिरी व्यक्त करण्याला माझ्या कर्तव्याची मर्यादा आहे. मी दया मागत नाही. न्यायालय देईल ती शिक्षा मला मान्य असेल”. यावर न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी म्हटलं की, “प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. ती का ओलांडावी ? आम्ही लोकांच्या हितासाठी चांगल्या खटल्यांचा पाठपुरावा करण्याचं स्वागत करतो, परंतु लक्षात ठेवा ही एक गंभीर बाब आहे. मी न्यायाधीश म्हणून गेल्या २४ वर्षात एकालाही अवमानप्रकरणी दोषी ठरवलेलं नाही”.
न्यायालयाने प्रशांत भूषण यांनी पूर्ण पडताळणी केल्याशिवाय शिक्षा सुनावली जाणार नाही असं सांगितलं. न्यायालयाने यावेळी प्रशांत भूषण यांची दुसऱ्या खंडपीठासमोर शिक्षेची सुनावणी करण्याची मागणी फेटाळून लावली.
न्यायपालिकेविरुद्ध केलेल्या दोन अवमानकारक ट्विट्सबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी भूषण यांना फौजदारी स्वरूपाच्या अवमानासाठी दोषी ठरवलं. या ट्विट्सला जनहितासाठी केलेली वाजवी टीका म्हटले जाऊ शकत नाही, असं न्यायालयाने म्हटलं होतं. या प्रकरणी भूषण यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षेबाबतचा युक्तिवाद आज न्यायालयात झाला. न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला ६ महिन्यांपर्यंतची कैद व २ हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही, अशी शिक्षा होऊ शकते.