रामजन्मभूमी- बाबरी मशीद जमीन वाद

नवी दिल्ली : रामजन्मभूमी-  बाबरी मशीद जमिनीच्या लांबलेल्या वादात सर्व पक्षांचा युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी १८ ऑक्टोबरची मुदत निश्चित केली. यामुळे राजकीयदृष्टय़ा संवेदनशील अशा या खटल्याचा निकाल नोव्हेंबरच्या मध्यात लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खटल्याची शनिवारीही सुनावणी करण्याची तयारी दाखवतानाच, या खटल्यातील पक्षांची इच्छा असल्यास या प्रकरणी मध्यस्थीच्या मार्गाने मैत्रिपूर्ण तोडगा काढण्याची आणि तो आपल्यासमोर ठेवण्याची त्यांना मुभा असल्याचेही न्यायालयाने सांगितले.

हिंदू व मुस्लीम या दोन्ही पक्षकारांच्या वकिलांनी दैनंदिन सुनावणीतील त्यांचे युक्तिवाद १८ ऑक्टोबपर्यंत पूर्ण करावेत असे आम्हाला वाटते, जेणेकरून न्यायाधीशांना निकाल लिहिण्याकरिता जवळजवळ ४ आठवडे मिळतील, असे न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांना सांगितले. या खटल्याची सुनावणी करणाऱ्या ५ सदस्यांच्या घटनापीठाचे अध्यक्ष सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार असल्यामुळे, युक्तिवाद संपवण्यासाठी न्यायालयाने निश्चित केलेल्या मुदतीला महत्त्व आहे. दरम्यानच्या काळात, यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या समितीसह कुणाच्या मध्यस्थीने या प्रकरणी तोडगा काढण्याची संबंधितांची इच्छा असेल, तर ते तसे करू शकतात आणि तोडगा निघाल्यास तो न्यायालयापुढे ठेवू शकतात, असे पीठाने आपल्या आदेशात नमूद केले.

शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण व एस. ए. नझीर या न्यायाधीशांचाही समावेश असलेल्या घटनापीठाने अयोध्या जमीन वादप्रकरणी सौहार्दपूर्ण तोडगा काढण्यासाठी मध्यस्थीचे प्रयत्न फसल्यानंतर, या प्रकरणाची सुनावणी ६ ऑगस्टला सुरू केल्यानंतर २६ दिवस संबंधित पक्षांच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकले आहेत.

या प्रकरणाची दीर्घ सुनावणी १८ ऑक्टोबपर्यंत पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडे १५ कार्यालयीन दिवस आहेत. आतापर्यंत हिंदू पक्षकारांनी १६ दिवस, तर मुस्लीम बाजूंचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी १० दिवस युक्तिवाद केला आहे. ही सुनावणी १८ ऑक्टोबपर्यंत पूर्ण करण्याचे आपण सर्वजण प्रयत्न करूया, जेणेकरून आम्हाला निकाल लिहिण्यासाठी ४ आठवडे मिळतील, असे न्यायालय म्हणाले.