गुजरात येथील भूजमध्ये मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी एका कॉलेजने ६८ विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता. या प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. सूरतमध्ये तब्बल १०० महिलांना विविस्त्र करून मेडिकल टेस्ट घेण्यात आली आहे. अविवाहित महिलांना काही आपत्तीजनक खासगी प्रश्नही विचारण्यात आलेत. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हे प्रकरण गुजरातमधील सूरत महानगरपालिकेच्या (एसएमसी) एका रूग्णालाचं आहे. एसएमसी कर्मचारी संघटनेनं महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यासमोर या घटनेची तक्रार केली आहे. आपल्या तक्रारीत कर्मचारी संघटनेने म्हटलेय की, जवळपास १०० महिला प्रशिक्षणार्थी कर्मचारी अनिवार्य फिटनेस टेस्टसाठी सूरत येथील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेत पोहचल्यानंतर हैराण झाल्या. कारण, तिथं त्या महिला प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना  १०-१० च्या गटानं विवस्त्र उभं करण्यात आलं. यावेळी परिक्षकांनी त्यांच्या खासगीपणावरही असंवेदनशीलता दाखवण्यात आली.

एका आधिकाऱ्यानं सांगितलं की, ज्या खोलीत महिलांना विवस्त्र करून उभं करण्यात आलं होतं. त्या खोलीचा दरवाजाही व्यावस्थित बंद केला नव्हता. खोलीमध्ये फक्त एक पडदा लावण्यात आला होता. फिटनेस टेस्टदरम्यान महिलांसोबत गैरवर्तनही केलं गेलं. तसेच त्यांना काही अतिखासगी आणि आपत्तीजनक प्रश्न विचारण्यात आले. यातील अविवाहित महिलांना तुम्ही कधी गर्भवती झाला होतात का? यासारखे प्रश्न विचारण्यात आले.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेतील स्त्री रोग विभागाचे प्रमुख अश्विन वछानी म्हणाले की, ‘रूग्णालयाच्या नियमांनुसार महिलांची शारीरिक चाचणी अनिवार्य आहे. अशी चाचणी पुरूषांची होते का नाही याबाबत माहित नाही. परंतु, महिलांच्या बाबतीत नियमांनुसार अशी चाचणी क्रमप्राप्त आहे. कारण महिलांना एखादा रोग आहे का नाही हे पडताळून पाहणं गरजेचं आहे. ‘

दरम्यान, याआधी गुजरात येथील भूजमध्ये  एका कॉलेजने ६८ विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने मुलींचे कपडे, अंतर्वस्त्रे उतरवली होती. मासिक पाळीमुळे नियमांचे उल्लंघन केले जाते असा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला होता. त्यामुळे त्यांनी या विद्यार्थिनींचे कपडे, अंतर्वस्त्रे उतरवून मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासले होते.