News Flash

दानिश सिद्दीकीच्या मृत्यूला आम्ही जबाबदार नाही; पण…; तालिबानची पहिली प्रतिक्रिया

दानिश यांचं पार्शिव शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसकडे सोपवण्यात आलं. 

तालिबान प्रवक्त्यांनी दानिश यांच्या मृत्यूसंदर्भात प्रतिक्रिया दिली (फोटो : रॉयटर्स आणि ट्विटरवरुन साभार)

जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कारविजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांचा शुक्रवारी अफगाणिस्तानामधील हिंसेचे वृत्तांकन करताना मृत्यू झाला. मात्र दानिश यांची हत्या तालिबानी बंडखोरांनी केल्याचं सांगितलं जात असली तरी आता तालिबानने या हत्येशी आपला काहीच संबंध नसल्याचं म्हटलं आहे. इतकचं नाही तर दानिश यांच्या मृत्यूबद्दल तालिबानने शोकही व्यक्त केलाय. दानिश यांचे पार्शिव शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसकडे सोपवण्यात आलं.

तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी दानिश यांच्या मृत्यूसंदर्भात सीएनएन न्यूज १८ शी बोलताना माहिती दिलीय. दानिश सिद्दीकीच्या मृत्यूला आम्ही जबाबदार नाही; पण तो या भागात असल्याची कल्पना आम्हा देण्यात आली नव्हती, असं तालिबानने म्हटलं आहे. “नक्की कोणत्या गोळीबारात भारतीय पत्रकाराचा मृत्यू झाला याची आम्हाला माहिती नाही. त्यांचा मृत्यू कसा झाला हे आम्हाला ठाऊक नाही,” असं मुजाहिद म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “युद्ध सुरु असणाऱ्या प्रदेशामध्ये एखादा पत्रकार येत असेल तर त्यासंदर्भातील माहिती आम्हाला दिली पाहिजे. त्या व्यक्तीला काही होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ,” असंही मुजाहिद म्हणालेत.

आम्हाला खेद…

“भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकींच्या मृत्यूबद्दल आम्हाला खेद आहे. आम्हाला कोणतीही माहिती न देता या युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशात पत्रकार प्रवेश करत असल्याचंही आम्हाला दु:ख वाटतंय,” असं मुजाहिद म्हणाले आहेत.

जखमींवर पाकिस्तानच्या सीमेजवळ इलाज

मागील दोन दिवसांपासून कंदहार प्रांतामधील स्पीन बोल्डाक या मुख्य बाजारपेठेच्या भागात अफगाणिस्तान लष्कर आणि तालिबान्यांमध्ये गोळीबार सुरु आहे. या गोळीबारामध्ये जखमी झालेल्यांना तालिबान पाकिस्तानच्या सीमेजवळ असणाऱ्या रुग्णालयांमध्ये उपाचारांसाठी नेत असल्याची माहिती एएफपीने दिलीय.

नक्की काय घडलं?

‘रॉयटर्स इंडिया’चे मुख्य छायाचित्रकार असलेले सिद्दिकी ४० वर्षांचे होते. काही दिवसांपासून कंदहारमध्ये तालिबानी बंडखोर आणि अफगाण सैन्यात सुरू असलेल्या धुमश्चक्रीचे छायाचित्रण ते करीत होते, असे अफगाणिस्तानातील ‘टोलो न्यूज’च्या वृत्तात म्हटले आहे. अफगाणिस्तानची खास सुरक्षा पथके कंदहार प्रांतामधील स्पीन बोल्डाक हा मुख्य बाजारपेठेचा भाग तालिबान्यांच्या ताब्यातून परत मिळवण्यासाठी लढत आहेत. शुक्रवारी पहाटे तेथे तालिबानी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये हल्ले-प्रतिहल्ले झाले. तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात सिद्दिकी यांच्यासह एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला

अफगाणिस्तानमधील भारतातील राजदूतांनी काय सांगितलं?

अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरीद मामुंदझे यांनी सिद्दिकी यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले. अफगाण सुरक्षा दलांबरोबर असताना सिद्दिकी यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, असे त्यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीला सुरुवात केल्यानंतर तालिबानी बंडखोरांनी डोके वर काढले. सुरक्षा दले आणि तालिबान्यांमध्ये कंदहारनजीकच्या भागात तुंबळ धुमश्चाक्री सुरू आहे. अफगाणिस्तानचा ८५ टक्के भाग काबीज केल्याचा दावा तालिबानने अलीकडेच केला आहे.

‘पुलित्झर’ने सन्मानित

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली होती. त्यांनी दूरचित्रवाणी पत्रकार म्हणून सुरुवात केली आणि नंतर ते छायाचित्र पत्रकारितेकडे वळले होते. २०१० मध्ये ते रॉयटर्समध्ये दाखल झाले होते. सिद्दिकी व त्यांचे सहकारी अदनान अबिदी यांना २०१८ मध्ये रोहिंग्या निर्वासितांच्या पेचप्रसंगाच्या छायाचित्रणासाठी पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिद्दिकी यांनी २०२० मधील दिल्ली दंगल, करोना विषाणू साथ, नेपाळमधील २०१५ चा भूकंप, मोसुलमधील २०१६-२०१७ चा संघर्ष, हाँगकाँगमधील दंगली यांचे छायाचित्रांकन केले होते. त्यांची छायाचित्रे वाखाणली गेली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 10:13 am

Web Title: taliban denies role in journalist danish siddiqui death expresses regret scsg 91
टॅग : India News
Next Stories
1 सचिन पायलट यांचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले “पेट्रोलच्या किंमती तर…!”
2 “कबूतरं जामीन आदेश घेऊन येतील, या अपेक्षेने आजही…”; संथ कारभारावरून सर्वोच्च न्यायालय घेतलं फैलावर
3 पंजाबमध्ये ढवळाढवळ करू नका, मोठी किंमत मोजावी लागेल; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचं सोनिया गांधींना पत्र
Just Now!
X