मध्य प्रदेशच्या झाबुआ येथील एका सरकारी शाळेच्या निर्दयी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. या शिक्षकाला पोलिसांनी सोमवारी(दि.१३) अटक केली, न्यायालयाने त्याचा जामीनअर्ज फेटाळून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे.

आरोपी शिक्षकाने एका सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला गृहपाठ न केल्याबद्दल एकूण 168 वेळेस कानाखाली मारण्याची शिक्षा दिल्याचं समोर आलं आहे. मनोज कुमार वर्मा (वय-35) असं या निर्दयी शिक्षकाचं नाव आहे. विद्यार्थिनीला कानाखाली मारण्यासाठी आरोपी शिक्षकाने तिच्याच वर्गातील 14 विद्यार्थिनींची निवड केली होती. या 14 जणींनी त्या विद्यार्थिनीला सहा दिवस रोज दोन कानाखाली मारण्याची शिक्षा होती. जवाहर नवोदय स्कूलमध्ये यावर्षी जानेवारी महिन्यात ही घटना घडली होती.

विद्यार्थिनीचे वडील शिव प्रताप सिंग यांनी सांगितल्यानुसार, ‘1 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीत माझी मुलगी आजारी असल्यामुळे शाळेत गैरहजर होती. बरं वाटायला लागल्यावर 11 जानेवारी रोजी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली. पण गृहपाठ अपूर्ण असल्यामुळे चिडलेल्या शिक्षकाने तिला ही भयानक शिक्षा दिली’.

मुलीने घरात सांगितल्यानंतर शाळेत घडलेला पकार उघडकीस आला. वडिलांनी घटनेचं गांभीर्य ओळखून शाळा प्रशासनाकडे तातडीने तक्रार केली. शाळा प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी केल्यावर शिक्षक दोषी असल्याचं आढळलं. तोपर्यंत विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलीस स्थानकातही तक्रार दाखल केली होती. घडलेल्या प्रकारानंतर मुलगी आजारी पडली होती, त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रचंड घाबरल्यामुळे नंतर शाळेत जाण्यास ती नकार द्यायची असं तिच्या वडिलांनी सांगितलं.