News Flash

बंगालमध्ये शाळकरी मुलीच्या हत्या प्रकरणाला नाट्यमय वळण, तलावात सापडला आरोप असलेल्या मुलाचा मृतदेह

पश्चिम बंगालमध्ये १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणात नाट्यमय घडामोडी

मुलीच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी जाळपोळ केली होती

पश्चिम बंगालमध्ये १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं आहे. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर ग्रामस्थांनी हिंसाचार करत गाड्यांची जाळपोळ केली होती. यामध्ये पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या होत्या. मात्र प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून ज्या मुलावर आरोप करण्यात येत होता त्याचाही घटनास्थळापासून थोड्या अंतरावर एका तलावाजवळ मृतदेह सापडला आहे.

मुलाच्या आईने दोघेही दहावीत असल्याने एकमेकांना ओळखत होते अशी माहिती दिली आहे. पण दोघेही नात्यात होते हा दावा त्यांनी फेटाळला आहे. मुलाच्या मृत्यूसाठी त्यांनी मुलीच्या कुटुंबाला जबाबदार धरलं आहे. मुलीच्या वडिलांनी पोलीस तक्रारीत मुलाचा उल्लेख करत त्याच्यावर आरोप केले होते. मुलानेच कट रचत आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

पश्चिम बंगाल पोलिसांनी मुलीचा शवविच्छेदन अहवाल ट्विट करताना विषबाधा झाल्याने मृत्यू झाला असल्याचं सांगितलं होतं. तसंच शरीरावर कोणतीही जखम झाली नसल्याचं सांगत लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा फेटाळला होता. यानंतर आता पोलिसांनी मुलीचा मृतदेह सापडला होता तेथून काही अंतरावर तलावाजवळ मुलाचा मृतदेह सापडला असल्याची माहिती दिली आहे. दोन्ही प्रकरणांचा सर्व बाजूंनी तपास करत असल्याची माहिती पश्चिम बंगाल पोलिसांनी दिली आहे.

याआधी सोमवारी पश्चिम बंगालमधील सिलगुडी येथे एका मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याचा आऱोप करत संतप्त जमाव रस्त्यावर उतरला होता. संतप्त जमावाकडून राष्ट्रीय महामार्ग अडवून जोरदार निदर्शन करण्यात आलं. कोलकातापासून ५०० किमी अंतरावर असणाऱ्या ठिकाणी जवळपास दोन तास आंदोलन सुरु होतं. पोलिसांनी आंदोलकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी जमावाकडून हिंसाचार सुरु झाला. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

दुपारी दोन वाजता सुरु झालेलं हे आंदोलन अनेक तास सुरु होते. आंदोलकांनी यावेळी तीन बसेस आणि पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केली. जवळपास पाच वाजण्याच्या सुमारास आंदोलक दुसऱ्या ठिकाणी गेले आणि पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केला. एका क्षणी स्थानिक पोलिसांवर धनुष्य आणि बाणाच्या सहाय्याने हल्ला करत होते.

हत्या करण्यात आलेल्या पीडित मुलीच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, “मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाने शोध सुरु केला होता. अखेर एका झाडाखाली तिचा मृतदेह सापडला होता”. स्थानिकांनी मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पोलिसांना घटनास्थळी दोन सायकल आणि मोबाइल फोन सापडले. पोलिसांनी मात्र लैंगिक अत्याचाराचा दावा फेटाळून लावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 3:58 pm

Web Title: teen blamed for girls death found dead in pond in bengal sgy 87
Next Stories
1 सचिन पायलट यांना २४ जुलैपर्यंत न्यायालयाचा दिलासा; कारवाई न करण्याचे सभापतींना आदेश
2 चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळल्याचं वृत्त ही अफवा : इराण
3 लेह ते दिल्ली : नवजात चिमुकल्यासाठी १००० किलोमीटरवरून येतं आईचं दूध
Just Now!
X