हैदराबाद पोलिसांनी आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन तीन जणांना ताब्यात घेतले आहे. एका वृत्तवाहिनीने या तिघांचा भांडाफोड केला होता. यानंतर हैदराबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने हैदराबादमध्ये एक स्टिंग ऑपरेशन केले होते. यात आयसिसचे भारतातील जाळे कसे तयार होत आहे, त्यासाठी लागणारी आर्थिक रसद, आयसिसच्या एजंटना मिळणारी कायदेशीर मदत याविषयीचे माहिती समोर आली होती. हैदराबादमधील आयसिसशी संबंधीत तीन तरुणांचा या स्टिंग ऑपरेशनमध्ये समावेश होता. आयसिससाठी काम करणारे दहशतवादी चांगली मुलं असल्याचे यातील एका तरुणाने स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हटले होते. माझा सीरियातील आयसिसच्या म्होरक्यांशी संपर्क असल्याचा दावाही त्याने केला होता.
इंग्रजी वृत्तवाहिनीवरील वृत्ताच्या आधारे पोलिसांनी या तिन्ही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वृत्तवाहिनीकडून स्टिंग ऑपरेशनची मूळ प्रत हाती लागल्यावर तपासात महत्त्वाचा पुरावा हाती येईल असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, एप्रिलमध्ये दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने जालंधर, मुंबई आणि बिजनोरमधून आयसिसच्या तीन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते.
Hyderabad (Telangana): Three ISIS suspects detained, questioning underway- Avinash Mohanty DCP, CCS Hyderabad
— ANI (@ANI) May 17, 2017