देशातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारबरोबच देशभरातील विविध राज्यांच्या सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता गुजरात सरकारने एक निर्णय घेतला आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सोमवारी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात मास्क न घालणाऱ्यांना आकारल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम दुप्पट केली आहे. मास्क न वापरणाऱ्यांना आता ५०० रुपयां ऐवजी १ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटले होते की, मास्क न घालून लोकांचा व कुटुंबातील सदस्यांचा जीव धोक्यात आणणाऱ्यांबद्दल कडक भूमिका घेतली गेली पाहिजे.

मुख्यमंत्री रुपाणी म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत मंगळवार ११ ऑगस्टपासून राज्यात सार्वजनिक ठिकाणू मास्क न घालणाऱ्यांकडून ५०० रुपयां ऐवजी १ हजार रुपये दंड आकारला जाईल. रुपाणी यांनी राज्यातील नागरिकांना सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करण्याचे देखील आवाहन केले आहे.