अफगाणिस्तानातील अनेक भयंकर हल्ले केल्याचा आरोप असलेल्या हक्कानी नेटवर्कचा प्रमुख मरण पावल्याचा तालिबनाने इन्कार केला आहे.
अनेक वर्षांपासून तालिबानचा प्रमुख असलेल्या मुल्ला ओमर याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सिराजुद्दीन याची संघटनेचा उपप्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली. याच वेळी, सत्तरीत असलेला जलालुद्दीन हक्कानी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त काही पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी शुक्रवारी दिले होते.
काही प्रसारमाध्यमांनी एका प्रसिद्ध जिहादी व्यक्तीच्या मृत्यूचे वृत्त पसरवले आहे. या दाव्याला काहीही आधार नाही. हक्कानी हा पूर्वी आजारी होता, परंतु आता देवाच्या दयेने बऱ्याच काळापासून त्याची प्रकृती चांगली असून त्याला सध्या काहीही त्रास नाही, असे निवेदन तालिबानने प्रसिद्ध केले आहे. हक्कानीच्या कुटुंबीयांनीही त्याच्या मृत्यूच्या अफवा नाकारल्या असल्याचे एका अफगाण तालिबान कमांडरने वायव्य अफगाणिस्तानातून वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. आपले हक्कानीच्या नातवाशी बोलणे झाले, असे तो म्हणाला.