बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांकडून सभांद्वारे एकमेकांसह विरोधी पक्षांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. निवडणूक प्रचाराच्या या आखाड्यात आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उतरले आहेत. आजपासून त्यांनी बिहारमधील जनेतत जाऊन प्रचाराला सुरूवात केली आहे.

पाकिस्तानचा पाठिंबा असलेले दहशतवादी आता काश्मीरमध्ये घुसू शकत नाहीत व जवानांवर हल्ला करू शकत नाहीत. कारण, जर तसं झालं तर भारतीय जवान पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचा खात्मा करतील. जेएनयूमध्ये आता कुणी म्हणू शकत नाही की, ‘भारत तेरे तुकडे होंगे…’. आता देशात मोदींजींच्या नेतृत्वात केवळ एकमेव नारा दिला जात आहे, तो म्हणजे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एक भारत श्रेष्ठ भारत आहे. असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रोहतास येथील सभेत बोलताना म्हणाले.

आणखी वाचा- Viral Video: “नितीश कुमार चोर है… मनरेगा का पैसा खाया है”; मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणाबाजी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारासाठी काश्मीर, दहशतवाद, पाकिस्तान व राम मंदिर हे प्रमुख मुद्दे उचलले आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता विकास केला आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा पाकिस्तानमध्ये घुसून खात्मा केला आहे. याशिवाय, आम्ही बिहारच्या जनतेला आश्वासन दिलं होतं की राम मंदिर उभारलं जाईल, ते आम्ही पूर्ण केले आहे. आता कुणी म्हणू शकत नाही की भाजपा दिलेला शब्द पाळत नाही. असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

अरवल येथी एका सभेत बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, आम्ही नेहमी सांगत होतो की, ”रामलला हम आएंगे मंदिर वहीं बनाएंगे”, राम मंदिरासाठी काँग्रेस, राजद आणि डावे पक्ष अडसर ठरत होते. मात्र मोदींनी ५ ऑगस्ट रोजी मंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त केला आहे.