केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी मोठ्याप्रमाणावर आक्रमक झाले आहेत. तर, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार असून आम्ही दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग बंद करू, असा इशारा मागील चार दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. यावर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

“केंद्र सरकार खरेदी यंत्रणेशी संबंधित मुद्यांची भीती दूर करण्यासाठी, शेतकऱ्यांशी चर्चा करू इच्छित आहे. त्यामुळे मला वाटतं की चर्चा व्हायला हवी. गैरसमजांमुळे आंदोलन सुरू आहे.” असं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरून काँग्रेस नेत्यांकडून पंतप्रधान मोदींसह भाजपावर जोरदार टीका केली जात आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तसेच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

भांडवलदारांच्या हितासाठी भाजपाकडून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न – थोरात

संसदेत कायदे मंजूर केल्यापासून शेतकरी राज्यांमध्येच आंदोलन करत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून सीमेवरच रोखण्यात आलं असून, दिल्लीत जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.