राज्य प्रभारी अरुण सिंह यांचे प्रतिपादन

भाजपची कर्नाटक शाखा संघटित असून, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली येथील सरकार चांगले काम करत आहे, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंह यांनी बुधवारी सांगितले.

येडियुरप्पा यांना हटवले जाणार असल्याची अटकळबाजी सुरू असतानाच तीन दिवसांच्या भेटीवर राज्यात आलेले सिंह यांनी, नेतृत्वबदलाच्या मुद्द्यावर आपण आधीच बोललो असल्याचे सांगून याबाबत कुठलेही थेट वक्तव्य करण्याचे नाकारले. ‘आमचे सर्व पक्ष कार्यकर्ते, मंत्री आणि आमदार एकत्र आहेत. त्यांच्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत,’ असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

पक्षाच्या आमदारांची काही तक्रार असेल तर त्यांनी माध्यमांमध्ये वक्तव्ये न करता आपल्याशी बोलावे, असे सिंह यांनी सांगितले. नेतृत्व बदलाबाबत प्रश्न विचारला असता, ‘मला याबाबत जे सांगायचे होते ते मी यापूर्वी अनेकदा सांगितले आहे,’ असे उत्तर सिंह यांनी दिले.

येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदी कायम राहतील असे सांगून सिंह यांनी अलीकडेच त्यांना बदलण्याची शक्यता नाकारली होती. सत्ताधारी भाजपमधील एक गट येडियुरप्पा यांना हटवण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या अटकळी काही दिवसांपासून व्यक्त करण्यात येत आहेत. तीन दिवसांच्या या भेटीत सिंह यांनी बुधवारी सायंकाळी सर्व मंत्र्यांसोबत बैठक घेतली. पुढील दोन दिवसांत ते आमदारांशी, तसेच त्यांना भेटू इच्छिणाऱ्या मंत्र्यांशी वैयक्तिक संवाद साधणार असून; शुक्रवारी ते प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सहभागी होतील, अशी माहिती पक्ष सूत्रांनी दिली.