एखादा जवान कर्तव्य बजावताना कामी आला तर हुतात्मा किंवा शहीद असे शब्द वापरले जातात पण आमच्या दस्तावेजांत मात्र हे दोन्ही शब्द नाहीत. त्यासाठी युद्धबळी, सुरक्षा कारवाईतील बळी असे शब्द वापरतो, असे उत्तर संरक्षण व गृह मंत्रालयाने केंद्रीय माहिती आयोगाला दिले आहे.

माहिती अधिकारात एका व्यक्तीने केंद्रीय गृहमंत्रालयाला शहीद किंवा हुतात्मा या शब्दांची कायदेशीर व्याख्या विचारली होती. या शब्दांचा गैरवापर केल्यास नेमक्या काय कायदेशीर तरतुदी आहेत. यातील नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा काय आहे अशीही विचारणा केली होती.

हा प्रश्न नंतर संरक्षण व गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला पण त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही त्यामुळे या व्यक्तीने केंद्रीय माहिती आयोगाकडे याची विचारणा केली. यावेळी माहिती आयुक्त यशोवर्धन आझाद यांनी घेतलेल्या सुनावणीस मंत्रालयाचे प्रतिनिधी हजर होते. त्यांनी आम्ही शहीद किंवा हुतात्मा असा शब्द वापरत नाही असे स्पष्ट केले.