राष्ट्रपतीपदाची निवडणूक हा भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. या निवडणुकीत भाजपने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी या निर्णयाला ट्विटरवरुन विरोध केला आहे. एनडीए आणि भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार कोणाचे नाव पुढे करायचे? यासाठी आणखी पारदर्शक विचार करायला हवा होता, असे आपल्या ट्विटमध्ये सिन्हा यांनी म्हटले आहे. सोमवारीच कोविंद यांचे नाव भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. या घोषणेला चोवीस तास उलटण्या आधीच शत्रुघ्न सिन्हा यांनी या नावाबाबत आपली नाराजी ट्विटमधून दर्शवली आहे.

सुरुवातीच्या ट्विटमध्ये त्यांनी रामनाथ कोविंद यांची निवड राष्ट्रपतीपदासाठी करण्यात आली, त्याबाबत अभिनंदन केले आहे. पण नंतर मात्र लालकृष्ण अडवाणी हे आपले गुरु, मित्र आणि मार्गदर्शक असल्याचेही ट्विट केले. भाजपच्या कोअर कमिटीने राष्ट्रपतीपदाचे नाव जाहीर करण्यासाठी उगाच इतर पक्षांसोबत चर्चा करण्यात वेळ घालवला असेही सिन्हा यांनी ट्विटरवर म्हटले आहे. खरेतर बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची निवड जेव्हा राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून करण्यात आली तेव्हा शिवसेनेनेही अशीच नाराजी दर्शवली होती. मात्र शिवसेनेचा विरोध आता मावळला आहे. त्यांनी रामनाथ कोविंद हे चांगले काम करतील, देशहिताचे निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांना पाठिंबा दिला आहे.

अशातच आता भाजप खासदार यांनी मात्र आपल्याच पक्षाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर नाराजी दर्शवली आहे. जेव्हा एनडीएकडून कोणतेही नाव चर्चेत नव्हते, अनेक नावांची शक्यता वर्तवली जात होती, तेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्याच नावाला पसंती दर्शवली होती. याआधीही शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपविरोधी वक्तव्ये केली आहेत. मात्र राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीबाबत ते असे काही ट्विट करतील अशी अपेक्षा कदाचित भाजप नेत्यांनाही नसावी. तरीही त्यांनी आपल्याच पक्षाच्या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर आळवत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.