“करोना व्हायरसला रोखण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या लसीमधून पैसा कमावण्याची ही वेळ नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लस पोहोचवणे, त्यांना ही लस उपलब्ध करुन देणे ही वेळेची गरज आहे” असे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले. इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने करोना व्हायरसविरोधात लस विकसित केली आहे. आजपासून या लसीच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या आहेत. ऑक्सफर्डकडून बनवण्यात येणाऱ्या लसीच्या उत्पादनासाठी आदर पूनावाला यांची कंपनी मदत करणार आहे. प्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांची टीम Covid-19 विरोधात लस विकसित करण्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. ऑक्सफर्डच्या लस प्रकल्पामध्ये आदर पूनावाल यांची सिरम इन्स्टिट्यूट भागीदार आहे. ऑक्सफर्डच्या या लस प्रकल्पामध्ये जगातील एकूण सात संस्था सहभागी आहेत.

आणखी वाचा- करोनाला रोखण्यासाठी बनवलेली लस ८० टक्के यशस्वी ठरेल, ब्रिटनमधील संशोधकांचा दावा

ब्रिटनमध्ये आजपासून चाचणी
करोना संदर्भात जगभरात १५० प्रकल्पांवर काम सुरु आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात स्वयंसेवकांना गुरुवारी या लसचा पहिला डोस देण्यात येईल. चिंपांझीमध्ये सापडलेल्या व्हायरसच्या आधारावर ही लस विकसित करण्यात आली आहे. जर्मनीने सुद्धा लस विकसित केली आहे. जर्मनीतील बायॉनटेक आणि पिफायझर या अमेरिकन कंपनीने मिळून करोना व्हायरसला रोखणारी एक लस विकसित केली आहे.

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील पहिल्या टप्प्याच्या चाचणीमध्ये १८ ते ५५ वयोगटातील एकूण ५१० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. खास करोनासाठी विकसित करण्यात आलेली ही लस ८० टक्के यशस्वी ठरेल असा प्राध्यापक सारा गिलबर्ट यांचा अंदाज आहे. त्या प्रोजेक्टच्या रिसर्च संचालक आहेत. सप्टेंबरपर्यंत लाखो लसीची निर्मिती करण्याचे लक्ष्य आहे. जेणेकरुन लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लस पोहोचेल.