News Flash

अध्यादेशाला जबाबदार असणाऱ्यांनी राजीनामा द्यावा

दोषी लोकप्रतिनिधींना पाठीशी घालण्यासाठी अध्यादेश काढण्याच्या कृतीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली असल्याने सदर

| September 28, 2013 12:52 pm

दोषी लोकप्रतिनिधींना पाठीशी घालण्यासाठी अध्यादेश काढण्याच्या कृतीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली असल्याने सदर अध्यादेश काढण्यास जबाबदार असलेल्या सरकारमधील अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी केली आहे.
अध्यादेश काढण्याचा मूर्खपणा झाल्याची आता उपरती झाली आहे आणि काँग्रेसला खरोखरच अशी उपरती झाली असेल तर राज्यकारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. ज्यांनी हा मूर्खपणा केला असेल त्यांना त्याच पदांवर ठेवायचे की त्यांना घरी बसवायचे, असा सवाल अरुण जेटली यांनी केला आहे.
अध्यादेश काढण्यास जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर सरकार चुका करते, जगातही चुका होतात, मात्र काँग्रेसचे कुटुंब चुका करीत नाही हेच दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध होईल, अशी टीकाही जेटली यांनी नेहरू-गांधी घराण्यावर केली. राहुल गांधी यांनी अध्यादेशाला विरोध दर्शविणे म्हणजे झालेले नुकसान भरून काढण्याचा केलेला निकराचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.गेल्या काही दिवसांत या अध्यादेशाविरुद्ध राष्ट्रीय पातळीवर प्रतिक्रया उमटल्या आहेत. दोषी लोकप्रतिनिधींना कायदेमंडळाचा भाग बनविण्यास यूपीए सरकारने परवानगी दिली आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मंत्रिमंडळाने प्रथम विधेयकाच्या स्वरूपात आणि त्यानंतर अध्यादेशाच्या स्वरूपात याला दोनदा मंजुरी दिली आहे. दोन्ही वेळेला काँग्रेस पक्षाने याचे समर्थन केले आहे, असेही ते म्हणाले.
विरोधी पक्ष आणि संसदेने घेतलेल्या भूमिकेमुळेच हे विधेयक मंजूर न करता स्थायी समितीपुढे पाठविण्यात आले, असेही जेटली म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 12:52 pm

Web Title: those responsible for ordinance on convicted lawmakers should resign arun jaitley
टॅग : Arun Jaitley
Next Stories
1 मंगळावर सापडले पाण्याचे पुरावे
2 जावडेकरांसह तिघांची सीबीआयकडून कथित व्हिडिओ टेपप्रकरणी चौकशी
3 पाकिस्तानी न्यायालयाने ‘आयएसआय’च्या कार्यपद्धतीची माहिती मागविली
Just Now!
X