भाजपाचे आमदार विक्रम सैनी यांनी वादग्रस्त वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. ज्या लोकांना देशात असुरक्षित असल्याची भावना आहे तसंच आपल्याला धमकावलं जात असल्याचं वाटत आहे अशा लोकांना बॉम्बने उडवलं पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विक्रम सैनी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरचे आमदार आहेत. अभिनेता नसरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वी देशात असुरक्षित वातावरण असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर नाव न घेता विक्रम सैनी यांनी टीका केली आहे.

‘माझं वैयक्तिक मत आहे की, ज्यांना भारतात असुरक्षित तसंच धमकावलं जात आहे असं वाटतं अशा लोकांना बॉम्बने उडवलं पाहिजे. मला मंत्रीपद द्या मी अशा लोकांना बॉम्बने उडवून टाकेन. एकालाही सोडणार नाही’, असं विक्रम सैनी यांनी म्हटलं आहे.

जे लोक देशात धोका आहे, किंवा येथे सुरक्षित नाही असं म्हणतात ते देशद्रोही आहेत असंही विक्रम सैनी यांनी म्हटलं आहे. अशा लोकांसाठी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. त्यांच्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज असून, त्याअंतर्गत शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. अशा लोकांना देशद्रोही श्रेणीत टाकलं पाहिजे.

एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी ही माझी नेहमीचीच भाषा असल्याचं सागितलं. ‘असे लोक इथे का राहतात. त्यांनी देश सोडून गेलं पाहिजे. देशभक्तीची भावना नसेल तर मग या देशात राहून काय फायदा. त्यांना जिथे सुरक्षित वाटतं तिथं निघून जावं’, असं विक्रम सैनी बोलले आहेत. पुढे बोलताना त्यांनी हे आपलं मत असून याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं सांगत वाद टाळण्याचा प्रयत्न केला.