दिल्ली, हरयाणा, राजस्थानसह उत्तर भारताला सोमवारी मध्यरात्री धुळीच्या वादळाचा तडाखा बसला. वादळासह मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. वादळाच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन दिल्ली सरकारने केले आहे.

हवामान खात्याने तेरा राज्य व दोन केंद्रशासित प्रदेशात सोमवारी मोठे वादळ येण्याची शक्यता वर्तवली होती. यानुसार सोमवारी रात्री राजस्थान, हरयाणा आणि दिल्लीत धुळीचे वादळ धडकले. या वादळात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे वाहतुकीला फटका बसला.

हवामान खात्याच्या माहितीनुसार पंजाब, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरााम, त्रिपूरा, बिहार, मध्य प्रदेशमधील पश्चिमेकडचा भाग, उत्तर प्रदेशमधील पूर्वेकडील भाग, पूर्व राजस्थान, कर्नाटक किनारपट्टी, तामिळनाडू आणि केरळ याा राज्यांमध्ये वादळाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  गेल्या आठवड्यात पाच राज्यांमध्ये आलेल्या धुळीच्या वादळात १२४ जण ठार झाले होते. तर ३०० जण जखमी झाले होते.

LIVE UPDATES:

> वादळाचा फटका दिल्ली विमानतळावरील सेवेवर.

> वादळामुळे दिल्लीतील काही भागांमध्ये झाडे रस्त्यांवर उन्मळून पडली

> मेरठमध्ये धुळीचे वादळ

>  दिल्ली, रोहतक, भिवानी, गुरुग्राम, बागपत, मेरठ आणि गाझियाबादमध्ये वादळासह मुसळधार पावसाची शक्यता.

> दिल्लीतही वादळ धडकले.

> हरयाणातील गुरुग्राममध्ये धुळीचे वादळ

> राजस्थानच्या झुंझूनू भागात वादळाचा कहर

> राजस्थानच्या सीकर जिल्ह्याला वादळाचा तडाखा, परिसरातील वीजपुरवठा खंडीत.

>गाझियाबाद व मेरठमधील सर्व शैक्षणिक संस्थांना मंगळवारी सुट्टी जाहीर.

> दिल्ली सरकारने नागरिकांसाठी अॅडव्हायझरी जारी केली