नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या नेत्रदीपक  विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी अमेरिकेत तीन दिवसांचा आनंद सोहळा जाहीर केला असून सर्व घरे, समाजमंदिरे व मंदिरे येथे दिवे लावले जाणार आहेत. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर येथे भाजप समर्थकांनी जल्लोषात भाजप व मोदींचा विजय साजरा केला.
भारतासाठी हा आनंदाचा क्षण आहे. आम्ही सर्व अनिवासी भारतीयांना त्यांच्या घरात १६, १७ व १८ मे रोजी दिवे लावून दिवाळी साजरी करायला सांगितली आहे, असे ओव्हरसीज फ्रेंड्सचे अध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी सांगितले. टम्पा येथील रहिवासी असलेल्या पटेल यांनी ‘ओएफबीजेपी’ चमूचे नेतृत्व केले. त्यांच्या संघटनेने एक हजार स्वयंसेवक भारतात प्रचारासाठी पाठवले व त्यांनी देशाच्या विविध भागांत प्रचार केला. मोदी यांच्या विजयामुळे परदेशस्थ भारतीयांच्या हितालाही मान्यता मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, की मोदीयुगाची भारतात सुरुवात झाली आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क, जर्सी सिटी, एडिसन, शिकागो, टम्पा, हॉस्टन, डल्लास, लॉसएंजल्स, सानफ्रान्सिस्को व बृहत् वॉिशग्टन येथे निवडणूक पाटर्य़ा करण्यात आल्या. वॉिशग्टन डीसी येथे एका रेस्तरॉमध्ये मोदी समर्थकांनी  टीव्हीवर निवडणूक निकालांचा आनंद सोहळा पाहिला व लाडू वाटले. आम्ही २७२ जागा मिळवण्याचे स्वप्न खरे केले आहे, असे रजत गुप्ता यांनी भाजपची विजयाकडे होत आगेकूच बघितल्यानंतर सांगितले. न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअर येथे भाजप समर्थकांनी लोकसभेचे निकाल पाहिल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला. तसेच जे लोक जमले होते त्यांना चहा-समोसा देण्यात आला.