केंद्र सरकारने ५०० व हजार रूपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशातील नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. आपल्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांसमोर लोकांच्या रांगा लागल्या असून रांगेत उभारून अनेकांचा मृत्यूही झाला आहे. नागरिकांकडे खर्चासाठी पैशांचा तुटवडा असल्यामुळे दैनंदिन गरजा भागवण्यासाठीही अनेकांना मोठी कसरत करावी लागत आहे. नागरिकांना समस्येचा सामना करावा लागू नये म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावर १८ नोव्हेंबरपर्यंत टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण मंत्रालयाने २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत देशातील कोणत्याही विमानतळावर पार्किंग शूल्क आकारले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. यासंबंधीचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
दि. ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून टोलनाक्यांवर प्रवासी व टोल नाक्यावरील पाचशे व हजार रूपयांच्या नोटा स्वीकारण्यावरून वाद सुरू झाले होते. त्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी ही निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने काही दिवस टोलमाफीचा निर्णय घेतला होता. तशीच परिस्थिती देशातील विमानतळावर होत होती. यावर उपाय म्हणून नागरी उड्डाण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये, प्रवास सुरळित होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.